पुणे - मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याला महाविकास आघाडीला अपयश आले आहे. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम राज्य सरकारने केल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
भाजपा आयोजित दिव्यांग व्यक्तीला साहित्य वाटपाच्या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या पाठीत राज्य सरकारने खंजीर खुपसला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मराठा आरक्षण कधी मान्यच नव्हते. देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती. मग मराठा समाजला आरक्षण का नाही दिले नाही, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, आताही सर्वोच्च न्यायालयात प्रकरण व्यवस्थित चालविण्यात आले नाही. नामांकित वकील देऊन काही होत नाही. कॉर्डिनेशन (समन्वय) लागते. आमच्यावेळी उच्च न्यायालयात ९० दिवस प्रकरण चालले. तर, ९० दिवस संध्याकाळी तीन तास प्रति न्यायालय भरवित होतो. काय चुकले, उद्या काय मांडायचे, अशी आम्ही तयारी केली होती.
हेही वाचा-मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही - मुख्यमंत्री
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी कोणी मंत्री गेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीत बसून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केली नाही. वकील हे दिशाहीन होते, असा पाटील यांनी दावा केला. मराठा मागास कसा हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये सगळे आले आहे.