पुणे - कोरोनाच्या काळात प्रत्येक जण कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेत आहे. बाजारातील भाजीपाल्यापासून ते विविध जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करताना योग्य त्या घबरदाऱ्या घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र, या वस्तुंच्या निर्जंतुकीकरणासंदर्भात अनेकांच्या मनात साशंकता असते. ही शंका दूर करण्यासाठी 'गो कोरोना कॅबिनेट' यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे.
पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या आनंद मेश्राम यांनी भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तुंच्या निर्जंतुकीकरणासाठी मेक इन इंडियाच्या धर्तीवर 'गो कोरोना कॅबिनेट' हे यंत्र तयार केले आहे. मेश्राम यांनी अतिनील किरणांवर विकसित केलेले 'गो कोरोना' आणि 'गो कोरोना कॅबिनेट' या यंत्राच्या माध्यमातून भाजीपाला तसेच बाजारातील इतर वस्तुंचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे.