महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'पीएमपी'ला लॉकडाऊनचा फटका, तीन महिन्यांत दीडशे कोटींचे नुकसान - 150 कोटी पीएमपीएल नुकसान

पीएमपीच्या ताफ्यात 2600 बसेस आणि दहा हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. सध्या पुण्यातील काही मार्गांवर 100 बसेस धावत आहेत. याद्वारे अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण केली जाते.

pmp
लॉकडाऊनमध्ये पीएमपीला दीडशे कोटींचे नुकसान

By

Published : Jun 17, 2020, 6:44 PM IST

पुणे- लॉकडाऊनच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली. पुण्याची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या पीएमपीएमएलवरही (पुणे महानगर परिवहन महामंडळ) आर्थिक संकट घोंघावत आहे. लॉकडाऊनच्या काळात सेवा बंद असल्याने पीएमपीएमएलला तब्बल दीडशे कोटींचे नुकसान झाले आहे. 17 मार्चपासून पीएमपीएलची बस सेवा बंद आहे. पीएमपीएमएलचे दररोजचे उत्पन्न साधारण 1 कोटी 60 लाख इतके आहे. महिन्याला 50 कोटी इतके उत्पन्न पीएमपीएमएलचे आहे. परंतु मागील तीन महिन्यांपासून हे सर्व उत्पन्न बंद आहे.

अनंत वाघमारे - ट्रान्सपोर्ट मॅनेजर, पीएमपी

पीएमपीच्या ताफ्यात 2600 बसेस आणि दहा हजारहून अधिक कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. सध्या पुण्यातील काही मार्गांवर 100 बसेस धावत आहेत. याद्वारे अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण केली जाते. इतर सर्व बस वेगवेगळ्या आगारात थांबून आहेत. या बसेसच्या मेन्टेनन्सचाही प्रश्न आता निर्माण होत आहे. कारण अधिक वेळ या बसेस एका जागी उभ्या राहिल्या तर, या बसेसचे अनेक पार्ट्स निकामी होऊ शकतात. त्यामुळे पुन्हा या बस रस्त्यावर आणणे हे मोठे आव्हान असणार आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतून पीएमपीएमएलला फक्त एक कोटीचे उत्पन्न मिळाले. यातून कामगारांचे पगार, देखभाल दुरुस्तीचा खर्च कसा करावा, असा प्रश्न प्रशासनापुढे आहे.

पुणे शहरात 4000हून अधिक पीएमपी बसेसचे थांबे आहेत. यातील 2500 पक्क्या स्वरुपातील तर 1500 तात्पुरत्या स्वरुपाची आहे. या तात्पुरत्या थांब्यावर प्रवाशांचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी उपाययोजना केल्या जातात. यावर्षीही ती कामे करण्याचे नियोजन होते. परंतु लॉकडाऊनमुळे ही सर्व कामे थांबली आहेत. पावसाच्या आधी पीएमपी गाड्यांची दुरुस्तीकामे केली जातात. परंतु यावर्षी बस बंद असल्यामुळे ही कामे करण्यात अडचणी निर्माण झाल्या. मोलकरीण संघटना, हमाल माथाडी संघटना यांच्यासह आणखी काही नागरिकांनी पीएमपीची सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. परंतु शासनाकडून अद्याप कुठलेही निर्देश आले नसल्यामुळे सेवा सुरू करता येत नसल्याचे पीएमपीएमएलचे ट्रान्सपोर्ट व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले.

लॉकडाऊनमध्ये पीएमपीला दीडशे कोटींचे नुकसान

कामगारांचे पगार देण्यातही अडचणी

पीएमएमएलचे 10 हजारांहून अधिक कामगार आहेत. तीन महिन्यापासून बस बंद असल्यामुळे उत्पन्न नाही. परिणामी, या कामगारांचे पगार देण्यासाठी पीएमपी प्रशासन असमर्थ आहे. सद्यस्थितीत फक्त 100 बस सुरू असल्यामुळे कामगारांना रोटेशन पद्धतीने काम विभागून दिले जात आहे.

पीएमपीएमएलमध्येही कोरोनाचा शिरकाव

महाराष्ट्रात मुंबईनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू पुणे शहरात आहे. या कोरोनाचा शिरकाव पीएमपीएमएलच्या कार्यालयातही झाला आहे. 4 ते 5 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु यशस्वी उपचारानंतर या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details