महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 23, 2022, 7:40 AM IST

ETV Bharat / city

Lokmanya Tilak Jayanti 2022 : लोकमान्य टिळक जयंती विशेष - आजही टिळकांच्या चतु:सुत्रीची आठवण

Lokmanya Tilak Birth Anniversary 2022 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार आणि प्राच्यविद्या पंडित होते. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला.

लोकमान्य टिळक जयंती
लोकमान्य टिळक जयंती

पुणे - ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असे इंग्रजांना आत्मविश्वासाने आणि धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज 166 वी जयंती आहे. लोकमान्य टिळकांच्या जयंतीच्या निमित्ताने पाहूया ईटिव्हीचा स्पेशल रिपोर्ट पाहूया...

लोकमान्य टिळकांचा जन्म -चिखलगाव ( Chikhalgaon ) हे लोकमान्य टिळक ( Bal Gangadhar Tilak ) यांचा मूळ गाव आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे पाळण्यातले नाव केशव होते, पण त्यांच्या मातोश्री हे त्यांना बाळ म्हणत म्हणून टिळकांनी बाळ हेच नाव कायम ठेवले. लोकमान्य टिळकांची आकलन शक्ती आणि पाठांतर शक्ती लहानपणापासूनच असामान्य होती. 1861 साली दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांचे नाव शाळेत दाखल करण्यात आले. 1866 साली टिळकांचे वडील असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर ( Assistant Deputy Educational Inspector ) होऊन पुण्यात ( Pune ) आले होते. त्यानंतरचे टिळकांचे शिक्षण हे पुण्यातच झाले, शाळेत शिकत असताना टिळकांनी संस्कृतमध्ये चित्र, काव्यरचना केली. 1872 साली टिळकांचे लग्न लाडघर येथील बल्लाळ पंत बाळ यांच्या कन्या तापी बाई यांच्याशी झाले झाले. तापी बाईंचे सासरचे नाव सत्यभामाबाई ठेवण्यात आले. त्याच वर्षी टिळकांच्या वडिलांचा आणि आईचा मृत्यू झाला.

लोकमान्य टिळक जयंती

अशी सुरवात झाली केसरी आणि मराठा वृत्तपत्र - मॅट्रिक झाल्यावर लोकमान्य टिळकांनी 1873 साली कॉलेजला प्रवेश केला. तेथे त्यांना छात्रवृत्ती मिळाली. 1876 साली गणित हा मुख्य विषय घेऊन टिळक प्रथम वर्गात बीए पास झाले होते. 1879 साली एल.एल.बी पास झाले. कॉलेजमध्ये शिकत असताना टिळक आणि त्यांचे मित्र गोपाळराव आगरकर साधील बाबाच्या टेकरीवर फिरायला जात असतं. भविष्यकाळातील योजनांबद्दल बोलत असे, शिक्षण पूर्ण झाल्यावर चिपळूणकर यांच्या पुढाकाराने या मित्रांनी 'न्यू इंग्लिश स्कूल' ही शाळा 1 जानेवारी 1880 रोजी सुरू केली. मुलांना राष्ट्रीय शिक्षण देणे, हा या शाळेचा उद्देश होता. थोड्याच दिवसात शाळेतील मुलांची संख्या वाढू लागली. शिक्षित समाजाला सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूलच्या संस्थापकांनी त्यावेळेस 2 वृत्तपत्रे सुरु करण्याचे ठरविले. त्यापैकी इंग्रजीतून मराठा हे पत्र 2 जानेवारी 1881 रोजी, तर मराठीतून केसरी हे पत्र 4 जानेवारी 1881 रोजी सुरू केले. महाराष्ट्राचे पहिले संपादक होते. टिळक आणि केसरीचे संपादक होते. सुरुवातीला काळात आगरकरांकडे 'केसरी' चे संपादकपद तर टिळकांकडे ‘मराठा' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह केसरीचे सम्पादकत्व स्वतःकडे घेतले. यानतंर मरेपर्यंत टिळकांचे अग्रलेख केसरीमध्ये येत राहिले.

केसरी हे मराठी भाषेत तर, मराठा हे इंग्रजी भाषेत होते. हे 2 वृत्तपत्रे काढण्याचा मूळ उद्देश एकच कि आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचा भारतीय समाजाला निरपेक्ष अहवाल देणे, हा केसरीचा मुख्य उद्देश आणि मराठा वृत्तपत्र हे शिक्षित भारतीयांसाठी होते. टिळकांना या वृत्तपत्रांच्या मदतीने जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करायचे होते. परिवर्तनांसाठी जनजागृती करायची संकल्पना त्यांच्या मनात होती. स्वतंत्र चळवळीत केसरीच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी ती वेळोवेळी मांडली.

लोकमान्य टिळकांच्या प्रसिद्ध अग्रलेखांची यादी - टिळकांनी 1881 ते 1920 या चाळीस वर्षांच्या काळात एकूण 513 आग्रलेख लिहिले, त्यापैकी काही प्रसिद्ध खालीलप्रमाणे...

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?, उजाडले पण सूर्य कुठे आहे ?, टिळक सुटले पुढे काय, प्रिन्सिपॉल, शिशुपाल की पशुपाल, टोणग्याचे आचळ, हे आमचे गुरूच नव्हेत, बादशहा ब्राह्मण, असे एकूण 513 अग्रलेख लोकमान्य टिळकांनी लिहिले आहेत.

शिवजयंती आणि गणेश उत्सव - लोकांना गणेश उत्सव आणि शिवाजी महाराज जंयती उत्सावाला साजरा करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी प्रेरित केले. या उत्सवांच्या माध्यमातून टिळकांना तरुणांमध्ये राजकीय जाणीव निर्माण करायची होती. त्याला त्याच्या ध्येयात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. आणि आजही शिवजयंती आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्या मनामध्ये राष्ट्रियत्वाची भावना निर्माण व्हावी, हाच त्यांचा उद्देश होता. 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. टिळकांनी शेतक-यांना संघटीत होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले आणि केसरी वर्तमान पत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या हक्कांची जाणिव करून दिली होती. 1897 साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्वपूर्ण ठरली. इंग्रज सरकारशी लढताना त्यांना 6 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावेळी त्यांनी मंडालेच्या तुरूंगात 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला आहे.

राजकीय जीवनाला सुरवात - बाळ गंगाधर टिळक 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यानंतर लगेचच त्यांनी स्वशासनावरील पक्षाच्या उदारमतवादी विचारांचा तीव्र निषेध करण्यास सुरुवात केली. या दरम्यान बाळ गंगाधर टिळक म्हणाले, की ब्रिटिश सरकारच्या विरोधात एक साधी घटनात्मक चळवळ करणे व्यर्थ आहे. त्यानंतर पक्षाने त्यांना त्यावेळचे काँग्रेसचे प्रमुख नेते गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विरोधात उभे केले. तथापि, लोकमान्य टिळकांना स्वराज्य मिळवण्यासाठी आणि इंग्रजांना हाकलण्यासाठी जोरदार बंड हवे होते. त्याचवेळी त्यांनी स्वदेशी चळवळीला आणि बंगालच्या फाळणीच्या वेळी ब्रिटिशांच्या मालावर बहिष्कार टाकण्याचे समर्थन केले. काँग्रेस पक्ष आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारसरणीतील फरकामुळे ते काँग्रेसची अतिरेकी ( चरमपंथी ) शाखा ( विंग ) म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र, या काळात टिळकांना बंगालचे राष्ट्रवादी बिपिन चंद्र पाल आणि पंजाबचे लाला लजपत राय यांनी पाठिंबा दिला होता. यावेळी या तिघांची 'लाल-बाल-पाल' नावाने ख्याती झाली. 1907 च्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेस पक्षातील उदारमतवादी आणि अतिरेकी गटांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे काँग्रेस 2 वेगवेगळ्या गटात विभागली गेली होती.

होमरूल लीगची स्थापना - 1915 मध्ये तुरुंगवास भोगून लोकमान्य टिळक भारतात परतले. तेव्हा पहिल्या महायुद्धामुळे राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या सुटकेमुळे लोकमान्य टिळकांच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली. यानंतर एकत्र त्यांनी त्यांची सुटका साजरी केली. यानंतर बाळ गंगाधर टिळक पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले आणि आपल्या सोबत्यांसोबत एकत्र येण्याचा निर्णय घेऊन त्यांनी एनी बेसेंट, मुहम्मद अली जिन्नाहा, युसूफ बैप्टिस्टा यांच्यासोबत 28 एप्रिल 1916 रोजी संपूर्ण भारतात होमरूल लीग आयोजित केले होते. स्वराज्यासह भाषिक प्रांतांची स्थापना आणि प्रशासकीय सुधारनेची मांग केली होती. टिळक यांनीही एक महान समाजसुधारक म्हणून अनेक गोष्टी केल्या होत्या, त्यांनी आपल्या आयुष्यात समाजात पसरलेल्या जातिव्यवस्था, बालविवाह या सर्व वाईट गोष्टीच्या विरुद्ध आवाज उठवला आणि महिलांच्या शिक्षणावर आणि विकासावर भर दिला.

लोकमान्य टिळकांचेमृत्यू-इ.स. १९२० साली आजारपणामुळे लोकमान्य टिळकांचे निधन झाले. पंडित जवाहरलाल नेहरूंना ही बातमी कळताच त्यांनी 'भारतातील एक तेजस्वी सुर्याचा आज अस्त झाला' असे उदगार काढले होते.

आजही लोकमान्य टिळकांच्या चतु:सुत्रीची आठवण -आज देशभरात स्वातंत्र्याच अमृतमहोत्सव साजरा होत असतना देशाची प्रगती आणि देशासमोर उभे असलेले आव्हानं याचा विचार केला, तर आजही लोकमान्य टिळकांच्या चतु: सुत्रीची आठवण होत आहे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतु: सुत्री लोकमान्य टिळकांनी सांगितली होती. आज देशात राष्ट्रीय शिक्षणाचा महत्त्व सर्वानाच माहीत आहे. आणि त्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहे. पंरतु, स्वदेशीच काय महत्त्व आहे. याच आज विचार होणे गरजेच आहे. आज आपण आपली आर्थिक परिस्थितीती पहिली तर रुपया हा डॉलरच्या तुलनेत खाली खाली येत आहे. त्यामुळे आपण स्वदेशीवर जास्तीत जास्त भर दिलं पाहिजे. आयात कमी करून, निर्यातीवर भर दिल पाहिजे, असे यावेळी लोकमान्य टिळकांचे पंतू डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -Aaditya Thackeray : औरंगाबादेत आदित्य ठाकरेंची तोफ बंडखोरांवर धडालली; 'सगळे नीट चालले असताना गद्दारी का'

ABOUT THE AUTHOR

...view details