पुणे - महिनाभरापासून लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या श्रमिकांचा धीर आता हळूहळू सुटत चालला आहे. देशाच्या विविध राज्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात आलेले आणि वेगवेगळ्या भागात वास्तव्य करणारे, हे श्रमिक आता मिळेल त्या वाहनाने अथवा पायीच आपल्या घराकडे निघाले आहेत. पुण्यातील अनेक रस्त्यांवर डोक्यावर कपड्यांची पिशवी आणि जमेल तितके सामान घेऊन हे श्रमिक आपल्याला जाताना दिसत आहेत.
छत्तीसगडमधील स्तलांतरीत कामगारपुणे येथून पायी गावी जात आहेत.. हेही वाचा....लॉकडाऊनवाली शादी! वधु नंदुरबारची नवरदेव धुळ्याचा अन् लग्न झाले रत्नागिरीत.. पाहा या अनोख्या लग्नाची गोष्ट
वाकड येथून झारखंडच्या दिशेने पायीच निघालेला श्रमिकांचा जथा पुण्यातील शिवाजीनगर परिसरात दिसला. त्यांच्यासोबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने बातचीत केली. त्यावेळी त्यांनी, 'आपण वाकड परीसरातील एका बांधकाम साईटवर प्लास्टरचे कामे करत होतो. तिथेच आसपास राहत होतो. काम सुरू असताना ठेकेदार सर्व व्यवस्था करीत होता. पण लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ठेकेदाराने दुर्लक्ष केले. नाही म्हणायला हजार रुपये दिले. पण हजार रुपये किती दिवस पुरणार आहेत. जवळचा पैसा संपला, खायलाही काही नव्हते त्यामुळे आता गावी जायचा निर्णय घेतला. रेल्वे मिळाली तर रेल्वे नाहीतर पायानेच आता आम्ही गावी जायचा निर्णय घेतला. एक महिना लागला तरी चालेल पण आम्ही घरी जाणारच' असे एका महिलेने सांगितले.
हेही वाचा...कोरोनाच्या संकट काळातून आत्मविश्वास व कृतीतून बाहेर पडू शकतो : नितीन गडकरी
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातून परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्यांना सूट देण्यात आली असून काही ठिकाणी 'श्रमिक स्पेशल' ट्रेनही सोडण्यात आल्या. यासाठी आपल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्यांना जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन नोंदणी करण्यास सांगण्यात आले होते. परंतू याविषयी सांगताना ही महिला म्हणाली, 'नाव नोंदवण्यासाठी आम्ही पोलीस ठाण्यातही गेलो होतो. तेव्हा दूर व्हा.. म्हणत पोलिसांनीही आम्हाला झिडकारले. आमचे काही ऐकूनच घेतले नाही. त्यामुळे आम्ही आता पायीच जायचे ठरवले' अशी तोंडी तक्रारच या महिलेने केली.
रोजगार मिळवण्यासाठी इतर राज्यातून पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊननंतर हे सर्व पुण्यात अडकून पडले आहेत. पुण्यातून आतापर्यंत मध्यप्रदेशातील रेवा उत्तरप्रदेशातील लखनौ, जोधपूर, जबलपूर, हरिद्वार, येथील सहा हजारहून अधिक श्रमिकांना 'श्रमिक स्पेशल' ट्रेनने सोडवण्यात आले. तर तेलंगणा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, ओरिसा, झारखंड या राज्यातील काही नागरिकांना खासगी वाहनाने त्यांच्या गावी सोडण्यात आले. परंतु पुण्यात अडकलेल्या हजारो नागरिकांना त्यांच्या गावी जायचे आहे. पुणे पोलिसांकडे आतापर्यंत 30 हजारहुन नागरिकांनी गावी जाण्यासाठी नोंदणी केली आहे.