पुणे - लॉकडाऊनमुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. उद्योगधंदे बंद असल्यामुळे रोजगार नाहीत. परिणामी जवळ पैसे नाहीत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे दोन वेळेच्या जेवणाचे हाल होत आहेत. लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या नागरिकांमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांही समावेश आहे. घरकाम करणाऱ्या बहुतांश महिलांचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह घरकामातून मिळणाऱ्या पैशातूनच होतो. परंतु लॉकडाऊनमुळे या महिला कामावर जाऊ शकत नाहीत. परिणामी त्यांना कोणताही मोबदला अथवा पगार मिळत नाहीये. या महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना यामुळे उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन जसजसा वाढत गेला तसतसे यांच्या अडचणीत भर पडत गेली. कोरोना व्हायरसच्या भीतीने सदनिकाधारक या महिलांना कामावर बोलावण्यास बिलकुल तयार नाहीत.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे घर काम करणाऱ्या महिलांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ... हेही वाचा...दहशतवादी कसाबला ओळखणाऱ्या साक्षीदाराचा उपचारखर्च भाजप करणार; फडणवीसांकडून मदतीची घोषणा
सोसायटीधारक 'या' महिलांना घरकामासाठी परवानगी देत नाहीत...
पुण्यासारख्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसला, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या परिसरातील नागरिकांना लॉकडाऊनच्या नियमांमधून सूट देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तुंखेरीज इतरही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत संचारबंदीतून देखील मोकळीक देण्यात आली आहे. परंतु असे असले तरिही घरकाम करणाऱ्या महिलांना सोसायटीमधील नागरिक कामावर येऊ देण्यास तयार नाहीत.
तुमच्यामुळे आम्हाला कोरोना होईल असे घरमालक म्हणतात...
वीस वर्षांपासून घरकाम करणाऱ्या बेबी सोनवणे यांना त्यांच्या सद्य परिस्थितीबाबत ईटीव्ही भारतने विचारले. त्यावेळी त्यांनी आपली कैफीयत मांडली. 'घरकाम करण्यासाठी तुम्ही चार ठिकाणी जाता, त्यामुळे तुम्हाला कोरोना होईल आणि तुमच्यामुळे आम्हालाही कोरोना होईल, अशी भीती घरमालकांना वाटते. त्यामुळे आम्हाला सोसायट्यामध्ये कामाला बोलवत नाहीत. लॉकडाउन संपल्यानंतर सरकार सांगेल तेव्हा कामाला या, असे आम्हालास सांगितले जाते' असे त्यांनी सांगितले.
ज्यांच्याकडे आजवर इतके वर्षे काम केले, त्यांनी देखील परिस्थीत समजून घेतली नाही...
कविता गायकवाड या देखील साधारण सात ते आठ घरी घरकाम करतात. त्यांनी देखील आपले म्हणणे ईटीव्ही भारतकडे मांडले आहे. 'ज्यांच्याकडे आम्ही आजवर काम केले, त्यांना आमच्या परिस्थितीबद्दल सांगितले तर त्यांनीही काहीच ऐकून घेतले नाही. काहींनी तर एप्रिल महिन्याचा पगार भेटणार नाही. तुम्हाला कामावरून काढून टाकले, असेच सांगितले. एकदोन नगरसेवक वगळता इतर स्थानिक नगरसेवकांनी आमच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही' अशी तक्रार वजा खंत कविता गायकवाड यांनी व्यक्त केली.
हेही वाचा...पंतप्रधानांनी दिले चौथ्या लॉकडाऊनचे संकेत, '१५ मे'ला पुन्हा करणार मुख्यमंत्र्यांसह चर्चा..
सोसायटीधारकांनी समंजसपणा दाखवावा : किरण मोघे
घरकाम करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या किरण मोघे यांच्याशी ईटीव्ही भारतने याविषयी चर्चा केली. यावेळी त्या म्हणाल्या की, 'कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागात जर इतर उद्योगधंद्यांना शासनाने परवानगी दिली असेल तर घरकाम करणाऱ्या महिलांनाही परवानगी द्यायला हरकत नाही. या महिला घरात आल्या तर कोरोनाची बाधा होईल, असा गैरसमज सध्या पसरला आहे. परंतु प्रत्यक्षात तसे काहीही नाही. परदेशातुन येणाऱ्या लोकांनीच कोरोना पसरवला आहे. त्यामुळे सोसायटीधारकांनी समंजसपणा दाखवून शासनाने घालून दिलेले नियम पाळत, या महिलांना काम करण्यास परवानगी दिली पाहिजे' असे किरण मोघे यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे आणि पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची प्रतिक्रिया... घरेलु कामगारांसाठी सरकारने कोणताही विचारच केलेला नाही : किरण मोघे
घरकाम करणाऱ्या महिलांबाबत सरकारने कोणतेही धोरण आखले नाही, असा आरोपही किरण मोघे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, 'घरकाम करणाऱ्या महिलांना कोणतेही कामगार कायदे लागू नाहीत. त्यामुळे त्यांना एप्रिल आणि मे महिन्याच्या पगार कसा मिळेल, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत निघालेल्या सरकारी आदेशात घरेलू कामगारांचा उल्लेख नाही. घरेलु कामगारांचा स्पष्ट उल्लेख असणारा आदेश जारी करावा, यासाठी आम्ही वारंवार सरकारी यंत्रणेकडे मागणी करत आहोत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. लॉकडाऊनच्या काळात या महिलांना नुकसानभरपाई म्हणून कामगार कल्याणकारी मंडळाकडून प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणीही आम्ही केली. परंतु सरकारकडून अद्याप त्याचेही उत्तर आले नाही' असे किरण मोघे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलतना सांगितले.
पुणे रेड झोनमध्ये असल्याने या महिलांबाबत लगेचच निर्णय घेता येणार नाही : महापालिका आयुक्त
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे का ? याबाबत विचारले होते. यावर त्यांनी, 'सरकारकडून आजवर काढण्यात आलेल्या आदेशात याविषयी स्पष्ट उल्लेख नाही. परंतु पुणे शहर अजूनही रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे याविषयी कोणताही निर्णय लगेचच घेता येणार नाही. शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर, 17 मे नंतर याविषयी निर्णय घेतला जाईल' असे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.