पुणे -तोंडाला मास्क, हातात पिशव्या आणि पैसे घेऊन ग्राहक दारू खरेदीसाठी सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभे होते. अनेक दिवसानंतर दारू मिळणार असल्याने त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. रेशन धान्य दुकानासमोर कूपन घेण्यासाठी ज्या प्रमाणे रांग लागते, तशीच रांग दारुसाठी लागली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणताही आदेश न आल्याने वाईनशॉप काही सुरु झाले नाही. त्यामुळे तीन ते चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर मद्य प्रेमींची मोठी निराशा झाली. वाईन शॉप समोरील गर्दी हटवण्यासाठी पोलीस देखील दाखल झाले. त्यानंतर मात्र, संताप व्यक्त करत मद्य प्रेमींनी घराचा रस्ता धरला.
'तुम्हीच सांगा काय करू'
यावेळी मद्य प्रेमींच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांनी प्रशासनाच्या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला. आम्ही टीव्ही वरच्या बातम्या पाहून आलो होतो. सकाळी सहा वाजल्यापासून उभे आहोत. आणि आता आम्हाला जायला सांगतायेत. तुम्हीच सांगा आम्ही काय करू, अशा शब्दात ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.