पुणे - सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड या पुण्यातील बापलेकाला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केल्यानंतर आता त्यांच्याकडील अलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी वेगवगळ्या गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या मोटारकार पोलिसांनी जप्त करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत जप्त केलेल्या आलिशान गाड्यांमध्ये रोल्स रॉयल, मर्सडिझ, रेंज रोवर, पजेरो अशा कोट्यवधी किंमतीच्या गाड्यांचा समावेश आहे.
लोकांना लुबडले
पोलिसांनी कारवाईचा फास आवळताच गायकवाडने लोकांकडून लुबडलेल्या खजिन्याबाबत माहिती दिली आहे. लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन बळजबरीने स्वत:च्या व कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने करून घेणे हा गायकवाडचा मुख्य व्यवसाय असल्याचे आता पुढे आले आहे. नानासाहेब शंकरराव गायकवाड ऊर्फ 'औंधचा भाऊ' याच्यासह त्याचा मुलगा गणेश नानासाहेब गायकवड आणि साथीदारांविरोधात मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवुन नेणे, दुखापत करणे, बेकादेशीर जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्नीशस्त्र बाळगणे, अवैधरीत्या पठाणी पद्धतीने सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. गायकवाड याच्यावर मोकाची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या अनेक कहाण्या समोर येऊ लागल्या आहेत.