पुणे - महाराष्ट्रात कलम 370 चा काय उपयोग, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. मात्र, ज्या मातांची मुलं जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना हुतात्मा झाली; त्यांना हा प्रश्न विचारा, असा सल्ला लडाखचे खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी दिला आहे. शहरात आयोजित करण्यात आलेल्या 'कलम 370 व लडाख केंद्रशासित प्रदेश' या चर्चासत्रात ते बोलत होते. तसेच फुटीरतावाद्यांना जात असणाऱ्या करदात्यांच्या पैशाबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार गिरीश बापट उपस्थित होते.
जम्मू व काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. मात्र, काही कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असल्याने याला विरोध करण्यात येत होता, असे नामग्याल म्हणाले. काही कुटुंब आणि फुटीरतावादी लोकांनी सामान्यांची एकजूट होऊ दिली नाही. यामुळे फुटीरतावाद्यांना पाठबळ देणाऱ्यांना निवडणुकीत मतदारच उत्तर देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.