महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेना देणार करारा जवाब? कोथरूडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला... - चंद्रकांत दादा पाटील

कोथरूड मतदारसंघातील लढतीचा घेतलेला आढावा...

कोथरूडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला...

By

Published : Oct 17, 2019, 3:19 PM IST

Updated : Oct 17, 2019, 4:33 PM IST

पुणे - 2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये युती तुटल्याने भारतीय जनता पक्षाला कोथरूड मतदारसंघात पाय रोवता आले. यावेळी भाजपच्या मेधा कुलकर्णी या शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांना हारवून आमदार झाल्या.

याआधी कोथरूड मतदारसंघ शिवाजीनगरचा भाग होता. पारंपरिकदृष्ट्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी होती. एकेकाळी विनायक निम्हण शिवसेनेच्या तिकीटावर या मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार यांनीही कोथरूडमध्ये शिवसेना उभी करण्यात मोठे योगदान दिले आहे. 2014 मध्ये या ठिकाणी भाजपने पाय रोवल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. यंदाच्या विधानसभेला शिवसेनेला मुसंडी मारण्याची संधी असताना भाजपने हा मतदारसंघ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आरक्षित केला. यासाठी त्यांनी स्वपक्षातील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना बॅकफूटवर टाकले.

व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा : कोथरूडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला...

कोथरूड मतदारसंघात सध्या महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याकडे भाजपचे नेतृत्त्व आहे. चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारातही ते सक्रीय असून, पक्षनेतृत्त्वाला विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यात यश आले असल्याने त्या देखील प्रदेशाध्यक्षांच्या प्रचारात भाग घेत आहेत.

चंद्रकांत पाटील याआधी पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून जात होते. परंतु, यंदा भाजपने थेट प्रदेशाध्यक्षांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने कोथरूड मतदारसंघात प्रतिष्ठेची लढत झाली आहे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात मनसेने कोथरूडमध्ये दोनदा नगरसेवक राहिलेले किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील स्वत:च्या पक्षातून उमेदवार देणे टाळले व किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. यामुळे कोथरूडकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले. किशोर शिंदे याच्या प्रचारात स्थानिक विरुध्द बाहेरचा उमेदवार हा मुद्दा अधोरेखित करण्यात येत आहे. लोकसभेच्या वेळी पुण्यातील मावळ मतदारसंघातून स्थानिक उमेदवारीच्या मुद्द्यावरून श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांच्या विरोधात विजय मिळवला होता. त्यामुळे स्थानिक असल्याचा फायदा किशोर शिंदे यांनाही होणार आहे. नुकतेच पार्थ पवार हे देखील किशोर शिंदे यांच्या प्रचारात दिसून आले. तसेच पक्षप्रमुख राज ठाकरे यांनीही मोठी ताकद पणाला लावली आहे.

सध्या कोथरूडमध्ये भाजप विरोधकांची एकजूट झाली असली, तरीही कोथरूडमधील संघाच्या विचारसरणीला मानणारे लोक तसेच ब्राम्हण समुदायाचा प्रभाव असल्याने चंद्रकांत पाटील यांना आयती मदत होऊ शकते. तसेच किशोर शिंदेंसाठी विरोधकांनी एकवटलेली ताकद, स्वत:चा जनसंपर्क व दोन वेळा नगरसेवक असताना केलेली कामे ही जमेची बाजू आहे.

शिवसेना फॅक्टर

कोथरूड मतदारसंघ तयार होण्याआधीपासूनच या ठिकाणी शिवसेनेची मोठी ताकद होती. त्यामुळे कोथरूडमध्ये आजही सेनेला मानणारा पारंपरिक मतदार आहे. तसेच सध्याचे मनसैनिक हे आधीचे शिवसैनिक असल्याने स्थानिक शिवसैनिकांमधील नाराजी मनसेला पाठिंबा दर्शवून बाहेर येऊ शकते.

चंद्रकांत पाटील यांचा राज्यभरातील जागावाटपात मोठा हात होता. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही जागेवर शिवसेनेला तिकीट न मिळाल्याने पुण्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. याचा 'करारा जवाब' देण्यासाठी कोथरूडमधील शिवसैनिक ऐनवेळी मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन भाजपला थेट राज्य पातळीवरच चपराक लावण्याचा प्रयत्न करू शकतात.

Last Updated : Oct 17, 2019, 4:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details