पुणे -पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्याच्या इमारतीत गर्दी कमी करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने पाच लाख चौरस फुटापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेले इंटिग्रेटेड टर्मिनल ( Pune Airport Integrated Terminal ) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट ( MP Girish Bapat ) यांच्या अध्यक्षतेखाली आज विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. तसेच खासदार बापट यांनी नुकतीच नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन विमानतळ विस्तारीकरणाबाबत निवेदन दिले होते.
असे असेल नवे इंटिग्रेटेड टर्मिनल -अत्याधुनिक नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल हे पूर्णत: वातानुकूलित असेल. प्रतिवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावण्याची त्याची क्षमता असेल. यात गर्दीच्यावेळी 2 हजार 300 प्रवाशांना (1 हजार 700, देशांतर्गत आणि 600 नग ) आंतरराष्ट्रीय सेवा देता येईल. या इमारतीत प्रवाशांना विमानापर्यंत पोचविणारे 5 नवीन मार्ग (पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज), 8 स्वयंचलित जिने (एस्केलेटर), 15 लिफ्ट, 34 चेक-इन काउंटर, प्रवासी सामान वहन यंत्रणा, आगमन क्षेत्रात पाच कन्व्हेयर बेल्टसह आदी अद्ययावत सुविधा इमारतीत असतील. तसेच नवे टर्मिनल हे पर्यावरणपूरक असेल. त्यात खाद्यपदार्थ आणि दुकानांसाठी 36 हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.