पुणे -आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा पुण्यातील गुन्हे शाखाकडून गोसावीला अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याच सांगितले जात होते. दरम्यान, काल पुण्यातील कामशेत भागात किरण गोसावी येऊन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. अखेर पुणे पोलिसांकडून गोसावीला अटक करण्यात आली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांनी 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावी याला 8 दिवसांची पोलीस कोठडी याआधी गोसावीच्या महिला सहकाऱ्याला अटक -
फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या महिला सहकाऱ्याला यापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेरबानो कुरेशी, असे त्या महिलेचे नाव आहे. शेरबानो कुरेशीसह गोसावीने पुण्यातील तरुणाची तीन लाखांची फसवणूक केली होती.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावी याला 8 दिवसांची पोलीस कोठडी किरण गोसावी विरोधात लुकआऊट नोटीस -
सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्स केसमध्ये किरण गोसावी हा मुख्य साक्षीदार आहे. मात्र, गोसावी पुण्यातील एका गुन्ह्यात फरार आरोपी असल्याची बाब समोर आली होती. गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली होती. गोसावी सापडत नसल्याने त्याला पुणे पोलिसांनी फरार घोषित केले होते.
के. पी. गोसावी नेमका कोण? -
किरण गोसावी हा देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचे मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. तसेच आर्यन खान प्रकरणात किरण गोसावी हा पंच आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
2018 मध्ये गोसावी याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी असण्यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्याला मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार होता. त्यामुळे फसवणुकीसंदर्भात फरासखाना पोलीस किरण गोसावीचा शोध घेत होते. तक्रारदार चिन्मय देशमुख याच्या माहितीनुसार गोसावीने आपल्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसविले आहे.
हेही वाचा -Aryan Khan Bail Granted : तिघांना जामीन; उद्या किंवा परवा तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता