पुणे - शहरात सध्या 80 टक्के कोरोना रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर शहरात सरकारी तसेच खासगी रुग्णालयामध्ये 4 हजार 300 च्या आसपास बेड आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. यातील 2 हजार बेडवर सध्या रुग्ण आहेत, तर 2 हजार 200 ते 2 हजार 300 बेड आजच्या घडीला रिकामे आहेत, असे महापौरांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -वाझे प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही, दोषींवर कारवाई होईल - अजित पवार
गरज पडल्यास जम्बो हॉस्पिटल सुरू केले जाईल
काही खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे महापालिकेच्या डॅश बोर्डवर दिसून येते आहे. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेने शहरातील ज्या ज्या मोठ्या रुग्णालयासोबत बेडबाबत सामंजस्य करार केले होते त्या रुग्णालयात पुन्हा बेडची संख्या वाढवण्यावर भर देत असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच भविष्यात गरज पडली तर सध्या बंद केलेले जम्बो कोविड रुग्णालय पुन्हा सुरू केले जाईल, असे महापौरांनी सांगितले आहे.
लसीकरण स्थिती -
दुसरीकडे पुण्यातील लसीकरणाची स्थिती पाहिली तर आजपर्यत एक लाख 75 हजार नागरिकांना डोस देण्यात आले आहेत. सध्या शहरात 84 लसीकरण केंद्र सुरू असून, 42 ही सरकारी तर 42 खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. जास्तीतजास्त लसीकरण करण्याचे प्रयत्न असल्याचे महापौर म्हणाले.
हेही वाचा -स्कॉर्पिओ सापडण्यापासून वाझेंच्या अटकेपर्यंत, असा राहिला घटनाक्रम