पुणे - शहरातील कोरोना रुग्णाच्या संख्येत गेल्या काही दिवसात मोठ्या वेगाने भर पडली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून पुणे शहरात सरासरी 2 हजार पेक्षा ज्यास्त रुग्ण दररोज आढळून येत आहेत. पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या अचानक वेगाने वाढत असल्याने प्रशासनाने आता तातडीने पावलं उचलायला सुरुवात केली असून जानेवारीमध्ये बंद करण्यात आलेले जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची पाळी महापालिका प्रशासनावर आली आहे.
सोमवारी 22 मार्चपासून हे जम्बो कोविड हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सोमवारी या रुग्णालयात 53 बेडची व्यवस्था करण्यात आली असून आठवडाभरात 500 बेड कार्यान्वित केले जाणार आहेत. यामध्ये 100 च्या वर आयसीयू बेड आणि 250 ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. या जम्बो हॉस्पिटलची महापौर, महापालिका आयुक्तांनी सोमवारी पाहणी केली. पुणे शहरात गेल्या वर्षी कोरोना उद्रेक झाल्यानंतर दवाखान्यात दाखल कराव्या लागणाऱ्या रुगणांची संख्या वाढत होती. त्यावेळी 800 खाटांचे जम्बो हॉस्पिटल पुण्यातल्या शिवाजीनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनियरींगच्या मैदानावर सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला या हॉस्पिटलवर खासगी व्यवस्थापन होते, मात्र गलथानपणाच्या आरोपानंतर महापालिकेने हे हॉस्पिटल स्वतःकडे घेतले.
पुण्यातील जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू हे ही वाचा - देशमुखांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही; तपासाची दिशा बदलण्यासाठीच आरोप - पवार
पुण्यात कोरोनाची दुसरी लाट -
डिसेंबर महिन्यानंतर रुग्ण संख्या कमी झाल्याने हे जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र त्यातील यंत्रणा तशीच ठेवण्यात आली होती. आता पुणे शहरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने खासगी रुग्णालयात असलेले बेड कमी पडू लागले आहेत. या परिस्थितीत महापालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घेत कोविड सेंटर सुरू केले आहे. या सोबतच खासगी रुग्णालयाचे बेड ही ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत असल्याने प्रशासन देखील चक्रावून गेले आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रसार हा वेगाने होत आहे. मात्र त्याची तीव्रता कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या अॅक्टिव्ह असलेल्या रुग्णापैकी 75 ते 80 टक्के रुग्ण हे होम आयसोलेशन मध्येच आहेत. या रुग्णांवर महापालिकेकडून योग्य मॉनिटरिंग केले जात असल्याचे महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी सांगितले.
वाढत्या रुग्ण संख्येमुळे आता महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. एकीकडे जम्बो रुग्णालय सुरू करत असताना, ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांच्या विलगीकरणासाठी 5 नवे कोविड केअर सेंटर सुरू करून दीड हजार नवे सीसीसी बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. सध्या पुणे शहरात 22 हजार 524 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यातले 2,350 रुग्ण दवाखान्यात दाखल आहेत आणि भविष्यात रुग्णालयाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत.