पुणे - कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून पुण्यातील जम्बो हॉस्पिटल चर्चेत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही या हॉस्पिटलमध्ये जवळपास 3 हजार पेक्षा जास्त रुग्णांनी उपचार घेतले आहेत. कोरोना संकटात पुणेकरांसाठी वरदान ठरलेले जम्बो कोविड हॉस्पिटल आत्ता बंद होणार आहे. येथे सध्या नवीन रुग्णांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर, येथे आता केवळ 41 रुग्ण असून, त्यांचेही उपचार पूर्ण होत आले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. काही रुग्णांना जूननंतरही उपचारांची गरज भासल्यास पुढील सात ते आठ दिवस हे रुग्णालय सुरू ठेवण्यात येणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
माहिती देताना पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त 30 ते 40 टक्के पुण्याबाहेरील रुग्णांवर उपचार
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ७०० बेड्सची सुविधा असलेले जम्बो हॉस्पिटल ऑगस्ट २०२० मध्ये सुरू करण्यात आले. डिसेंबरमध्ये ते बंद करण्यात आले. मात्र, फेब्रुवारीत कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर २३ मार्च रोजी महापालिकेने हे हॉस्पिटल सुरू केले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या हॉस्पिटलची क्षमता ७०० बेडपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे एप्रिल आणि मेमध्ये हे हॉस्पिटल शहर तसेच जिल्ह्यातील रुग्णांसाठी वरदान ठरले. मात्र, दुसऱ्यांदा हे हॉस्पिटल सुरू करताना प्रशासनाने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यावेळी हे हॉस्पिटल १५ जुलैपर्यंत वापरता येणे शक्य असल्याचे सांगण्यात आले.जम्बोत 30 ते 40 टक्के रुग्ण हे पुणे शहराबाहेरील आहेत. त्यांना पुणे महापालिकेच्यावतीनेच उपचार करण्यात आलं आहे, असेही यावेळी अग्रवाल यांनी सांगितलं.
तिसर्या लाटेत रुग्णसंख्या पुन्हा वाढल्यास सुरु होणार हॉस्पिटल -
जवळपास ८०० बेड्सची उपलब्धता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये आज फक्त ४२ रुग्ण उपचार घेत आहेत. ही पुणेकरांसाठी आणि आरोग्य विभागासाठी दिलासा देणारी बाब आहे. देशात सर्वाधिक हॉटस्पॉट शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली होती. मात्र, आता रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने जम्बो सेंटरसह अनेक हॉस्पिटलमध्ये बेड्स रिकामे झालेत. त्यामुळे तूर्तास तरी हे जम्बो हॉस्पिटल कोरोनामुक्त झाले आहे. मात्र, संभाव्य तिसर्या लाटेत रुग्णसंख्या पुन्हा वाढल्यास हेच हॉस्पिटल रुग्णांसाठी पुन्हा सेवेत येणार आहे. मात्र, ती वेळ येऊच नये हीच इच्छा प्रत्येक पुणेकरांची आहे.