पुणे -कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असल्यामुळे पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरमधील उपचारव्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 1 जानेवारीपासून येथील उपचार थांबवण्यात येणार आहेत. जम्बो रुग्णालयात सध्या 150 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सौरभ राव यांची माहिती
रुग्ण बरे होईपर्यंत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जातील, मात्र आता नव्याने येणाऱ्या रुग्णांना याठिकाणी अॅडमिट करून घेतले जाणार नाही. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.
जम्बो कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद
पुण्यात कोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर अधिकाधिक रुग्णांवर उपचार करणे सोयीचे व्हावे, यासाठी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात 105 कोटी रुपये खर्च करून आठशे बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. मात्र आता कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असल्यामुळे हे रुग्णालय तात्पुरते बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे.
...तर यंत्रणा पुन्हा सात दिवसाच्या आत सुरू होणार
जम्बो रुग्णालयातील उपचार थांबल्यानंतर येथील उपचाराची यंत्रणा मात्र कायम ठेवण्यात येणार आहे. भविष्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढली, तर यंत्रणा पुन्हा सात दिवसाच्या आत सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत पुण्यात असणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात पुरेशी व्यवस्था आहे. नायडू हॉस्पिटल, बाणेर मधील कोविड हॉस्पिटल, लायगुडे हॉस्पिटल आणि दळवी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेषे मनुष्यबळ उपलब्ध आहेत. त्यामुळे जम्बो हॉस्पिटल तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.