पुणे - जम्मूच्या दोडा जिल्ह्यात 19 जुलै 1999 सालच्या एका रात्री हिजबुल कमांडरच्या दहशतवाद्यांनी एक भयंकर रक्तपात घडवून आणला. एकाच कुटुंबातील 15 जणांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले होते. अशाप्रकारे एकाच कुटुंबातील इतके लोक मारले जाण्याची ही देशातील पहिलीच घटना होती. जोगिंदरचे कुटुंबीय ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य होते. त्यामुळे त्यांच्याकडेही बंदुका होत्या. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्नही केला. तीन दहशतवाद्यांना ठारही मारले. परंतु अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या दहशतवाद्यांचा समोर त्यांचा निभाव लागला नाही. या घटनेत जोगिंदरच्या कुटुंबियातील १५ जण ठार झाले होते. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यातून तेव्हा ४ वर्षांचा जोगिंदरसिंग बचावला होता. हाच जोगिंदरसिंग सध्या पुण्यात राहतो. पुण्यातील 'सरहद' या संस्थेत राहून तो शिक्षण घेत आहे.
या भीषण हल्ल्याची तेव्हा देशभर चर्चा झाली होती. तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी जोगीच्या कुटुंबातून बचावलेल्या सदस्यांची भेट घेतली आणि त्यांना संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. छोट्या जोगिंदरला तेव्हा जम्मूच्या एका शाळेत शिक्षणासाठी ठेवण्यात आले. तिथे दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी त्याला पुण्याच्या सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्या ताब्यात सोपवले आणि त्याच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याची विनंती केली. तेव्हापासून जोगिंदर पुण्यात आहे. त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. यादरम्यान तो जम्मूकाश्मीरच्या तत्कालीन राज्यपालांना भेटला. या भेटीत त्याला चांगल्या नोकरीचे आश्वासन देण्यात आले, पण अजूनही हे आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही.