पुणे - पुणे महापालिकेच्या वतीने किल्ले शिवनेरीवर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबाचे शिल्प उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
'मानवंदना देण्यासाठी हे शिल्प उभारण्यात येणार'
जिजाऊ या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर वास्तव्यास आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली बाल शिवबाचे शिक्षण शिवनेरीवर झाले. त्यानंतर राजमाता जिजाऊ आणि शिवबा पुण्यातील कसबा पेठेतील लाल महालामध्ये वास्तव्यास आले. जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अनेक गड-किल्ले निर्माण केले, शत्रूंबरोबर लढाईत जिंकून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांचा महापराक्रम, राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि मार्गदर्शन अवघ्या भारत देशाला प्रेरणादायी आहेत. या दोघांना मानवंदना देण्यासाठी हे शिल्प उभारण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
पुणे महापालिकेच्या वतीने सिंहगड किल्ल्यावर सन २०१७ मध्ये शूरवीर तानाजी मालुसरे यांचे भित्तीशिल्प उभारण्यात आले. पुरंदर किल्ल्यावर धर्मवीर संभाजी महाराजांचे शिल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच धर्तीवर शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबाचे शिल्प उभारण्यात येणार आहे. नगरसेवक अब्दुल गफुर अ. पठाण यांनी या बाबतचा ठराव दिला होता.
संयुक्त वन व्यवस्थापन योजनेसाठी २६ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद
महापालिका, वन विभाग आणि स्थानिक नागरिक यांच्या सहभागातून सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी शहरातील वनांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने नागरी संयुक्त वन व्यवस्थापन योजनेअंतर्गत करार करण्यास आणि त्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी ५ कोटी २५ लाख रुपये याप्रमाणे भांबुर्डे, वारजे वनक्षेत्रासाठी एकूण २६ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती हेमंत रासने यांनी दिली.