पुणे- गो रक्षण हीच खरी भक्ती आहे, ही प्रेरणा घेऊन पाबळ येथील जैन बांधवांनी एकत्र येऊन गोशाळा सुरू केली आहे. असे म्हटले जाते, की माणूस जेव्हा माणुसकीतून पहायला लागतो, तेव्हा त्याला पशूंमध्येही देव दिसतो. याच पशुधनाची सेवा पाबळ येथील गोशाळेत केली जात आहे.
शिरुर तालुक्यातील पूर्व भागात कायमस्वरुपी दुष्काळी संकट पहायला मिळते. या परिसरात सिंचनाची कुठलीही सुविधा आजवर उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे मानवी जीवनासह पशू-पक्ष्यांना दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावर सहन कराव्या लागतात. त्यामुळे पशुधन सांभाळणे कठीण होते.
दुष्काळी परिस्थितीत जीवापाड जपलेले पशुधन कसायाच्या हातात देण्यापेक्षा गोशाळेत देण्यास नागरिक पसंती देत आहेत. सामाजिक दायित्वातून सुरू झालेली ही जैन धर्मियांची गोशाळा सर्व सुविधांनी संपन्न आहे. या ठिकाणी जनावरांना चांगल्या दर्जाचा चारा आणि उपचार, असे सारे काही मोफत दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन संकटात आल्यानंतर हिच गोशाळा पशुधनाची सेवा करते, हिच खरी सामाजिक बांधिलकी आहे.
केवळ गोवंश बंदी कायदा लागू केला म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे नाही. भाकड गाई, वयोवृद्ध जनावरांच्या संगोपनासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असतानाही सरकारकडून केवळ आश्वासनांचा पाऊसच पाडला जातो. त्यामुळे कष्टकरी बळीराज्याचे पशुधन संकटात येत चालले आहे. पशुधन वाचवा, असे म्हणणाऱ्यांनी पशुधनाच्या संगोपनासाठी काही तरी करण्याची काळाची गरज बनत चालली आहे.