पुणे -महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू आणि सोबतच रान मांजर पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता बघावयास मिळणार आहे. आजपासून ही संधी उपलब्ध झाली असून त्यांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या पिंजऱ्यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी राज ठाकरे यांनी शेकरू, रानमांजर आणि वाघाटी मांजर यांची पाहणी करत माहिती जाणून घेतली. यावेळी उद्यानातील अनेक विभागातील व्यक्तींशी राज ठाकरे यांनी संवाद साधला. यामध्ये सर्प आणि इतर प्राण्यांबद्दल राज यांनी चर्चा केली.
हेही वाचा -लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मिळणार फिरण्याची सूट? वाचा, काय म्हणाले अजित पवार
राज ठाकरे हे मागील तीन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी पुण्यातील विविध मतदारसंघात जाऊन मनसेकडून महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधला. आज त्यांनी प्रभाग 40 मधील राजीव गांधी प्राणी संग्रालय येथील रान मांजर व शेकरू यांच्यासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या पिंजऱ्यांचे उद्घाटन केले. राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची त्यांनी आज पाहणी केली. राजीव गांधी प्राणी संग्रालयाचे काम महानगरपालिकेने कसे केले, याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत महापौर मुरलीधर मोहोळ, वसंत मोरे, स्थानिक नगरसेवक व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सर्प विभागाचे निलीमकुमार खैरई यांनी राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचा किस्सा सांगितला. बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या हातात एक भेट दिली होती, त्यावेळी ते म्हणाले, ही घे तुझ्यासाठी भेट आणली आहे. त्यावेळी भेटमध्ये विषारी जातीचा साप होता. तेव्हा मी बाळासाहेबांना म्हटले, हा विषारी साप आहे, तेव्हा बाळासाहेब म्हणाले, मी तुला भेट दिला आहे, तुला काय करायचे ते कर. यावेळी राज ठाकरे हा किस्सा विशेष लक्ष देऊन ऐकत होते.
हेही वाचा -यंदाही साध्यापद्धतीने बकरी ईद साजरी