पुणे -पर्यावरण रक्षणासाठी आज जेवढी जनजागृती केली जात आहे तेवढी जनजागृती कुठेच केली जात नाही. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आज अनेक संस्था, संघटना या काम करत असतात. अनेक लोक हे एकटे देखील काम करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील रमेश खरमाळे या अवलियाने चक्क पावसाचे पाणी साचवण्यासाठी 60 दिवसांत 70 हून अधिक चर खोदले आहे. त्याच्या या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद देखील झाली आहे.
हेही वाचा -Junnar Muslim Morcha : जुन्नरमध्ये नुपूर शर्मा विरोधात शिया मुस्लिम समाजाच्यावतीने मोर्चा
60 दिवसात 70 चर खोदले -जुन्नर वनखात्यात नोकरी करणारे खरमाळे हे वनरक्षक असून जुन्नर तालुक्यातील खोडद हे त्यांचे गाव आहे. जुन्नर तालुक्यातील धामनखेल येथील डोंगर माथ्यावर रोज पहाटे ५:३० ते ९:३० पर्यंत चर खोदायचे काम खरमाळे करतात. आणि नंतर ते शासकीय कामावर हजर राहतात. विशेष म्हणजे, रमेश खरमाळे यांनी त्यांच्या पत्नी स्वाती यांच्यासोबत या उपक्रमात भाग घेतला आहे. या पर्यावरणप्रेमी दांपत्याने १५ सप्टेंबर २०२१ रोजी या कार्याला सुरुवात केली आणि 60 व्या दिवशी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमत्ताने खरमाळे यांनी 70 हून अधिक चर खोदण्याचे काम पूर्ण केले.
रेकॉर्ड वनविभागाला समर्पित -देशसेवेचा बाळकडू 15 वर्ष भारतीय सैन्यात काम करताना मिळाले. त्याचा अनुभव घेत जुन्नर तालुक्यात वनविभागात काम केले आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केला. हा जो उपक्रम केला आहे यात कोणताही शासकीय कामचा फायदा घेतला नाही. मी या निमित्ताने एवढेच सांगेन की जर मी एकटे हे करू शकतो तर प्रत्येकाने जर ठरवले तर राज्यात ज्या भागात पाण्याची टंचाई आहे तिथे पाण्याची टंचाई भागणार नाही. आणि आज जो हा विक्रम झाला आहे तो मी वनविभागाला समर्पित करतो, असे देखील यावेळी खरमाळे यांनी सांगितले.
जवळपास ४१२ मीटर लांबीचे तयार केले चर -निसर्गप्रेमी खरमाळे दांपत्याने ६० दिवसांत ३०० तास काम करून ७० चरांची निर्मिती केली आहे. जवळपास ४१२ मीटर लांबीचे चर निर्माण केले आहेत. हे जे 70 चर तयार झाले आहेत त्यात 8 लाख लीटर पावसाचे पाणी साचेल व पावसात खड्डे भरले की जमिनीत पाणी जिरले जाईल. यंदा पाऊस चांगला झाला तर वर्षाला १ कोटी ६० लाख लिटर पाणी जमिनीत जिरवण्याचा उद्देश यशस्वी होईल, असे खरमाळे यांनी सांगितले.
500 झाडे लावणार -खोदलेल्या चरांच्या ढिगाऱ्यावर कमीत कमी 500 झाडे लावले जातील व त्यापासून त्या परीसरात जंगल निर्माण होण्यासाठी मदत होईल, असे खरमाळे यांनी यावेळी सांगितले. याशिवाय प्रत्येकाने निर्सगासाठी काही तरी करावे, अशी भावना देखील यावेळी खरमाळे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -PM Modi Dehu Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देहू दौरा; पोलीस महासंचालकांनी केली शिळा मंदिराची पाहणी