पुणे -कोरोनाने केवळ शारीरिक आरोग्यावरच परिणाम केला, असे नसून मानसिक आरोग्यावरही परिणाम केला आहे. कोराना विषाणूमुळे आरोग्याच्या समस्या कमी, परंतु मानसिक आणि सामाजिक समस्या, म्हणजेच 'सायको सोशल प्रॉब्लेम' अधिक वाढले आणि हे वाढत्या आत्महत्याचे महत्वाचे कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निकेत कासार यांनी सांगितले.
हेही वाचा -दिल्लीतील चित्र 2024 ला पूर्णपणे बदलेल - संजय राऊत
कोरोना, अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त
यंदाचा खरीप हंगाम अतिपावसाने बाद झाला. तर, लॉकडाऊन काळात संसर्ग वाढू नये यासाठी बाजार समितीमधील भाजीपाला व फळ विक्री बंद करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि नापिकी यामुळे जगावे कसे? या विवंचनेत मुलामुलींचे शिक्षण, लग्न आदी प्रश्न भर टाकत आहेत, यामुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे. ही करणे शेतकरी आत्महत्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहेत.
सर्वच जण मानसिक ताण तणावातून जात आहेत
कोरोनामुळे भीती, निराशा, हतबलता, अनिश्चितता, अविश्वास अशा सर्वच भावना वाढल्या आहेत. त्यातूनच प्रसारमाध्यमातून मिळणारी अतिमाहिती, गैर माहिती, अफवा यामुळे मानसिक ताणतणाव अधिकच वाढला आहे. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत भीती, चिंता, निराशा, झोप न येणे, आरोग्याची अति काळजी वाटणे, भूक कमी होणे, थकवा येणे, वैफल्यग्रस्त वाटणे, कोरोना होईल, अशी काळजी वाटत राहणे आणि आत्महत्येचे विचार येणे, अशा प्रकारची मानसिक त्रासाची लक्षणे दिसत आहेत, दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे, झोपेच्या गोळ्या अधिक प्रमाणात घेतल्या जात आहेत. अनेकांनी या काळात आत्महत्येमुळे जीव गमावले आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सेस, पोलीस, स्वच्छताकर्मी, सरकारी अधिकारी हे गट सर्वात जास्त मानसिक ताणतणावाखालून गेले आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीलाही नैराश्य आणि भीती/बेचैनीचा त्रास होत आहे. क्वारंटाईन राहिल्यामुळे किंवा राहायला लागेल, या भीतीने देखील मानसिक त्रास वाढलेले दिसत आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.
काउन्सिलिंग सेंटर उभारणे गरजेचे
सध्या नैराश्य येणे, एकमेकांवर राग काढणे, अशा गोष्टी घडत आहेत. नैराश्यातून टोकाची पावले देखील उचलली जातात. ऑनलाइन शिक्षणासारख्या मानसिक ताणतणाव वाढवणाऱ्या प्रणालीने अनेक मुलांची व पालकांची मानसिकता खालावत आहे. नोकरी गमावणे, आर्थिक ताण आणि लॉकडाऊनमुळे आलेला एकटेपणा व परावलंबित्व आल्यामुळे आत्महत्या रोखण्यावर लक्ष केंद्रित करणे आता अधिक महत्त्वाचे आहे. शासनाने यासाठी विशेष वैद्यकीय पथके व काउन्सिलिंग सेंटर उभारणे गरजेचे आहे.
हेही वाचा -पुणे विमानतळावरील हवाई वाहतुकीला आजपासून पुन्हा प्रारंभ