पुणे - शहरात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातही ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात एकूण १० हजार ७५१ ऑक्सिजन बेड आहेत, त्यात केवळ ४०९ बेड रिकामे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.
एकीकडे ऑक्सिजनची मागणी वाढलेली असताना, दुसरीकडे ऑक्सिजन भरून देण्याचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, रिफिलीग करून ऑक्सिजन सिलिंडर नेण्यासाठी एका सिलिंडरला सध्या ४०० ते ६०० रुपयादरम्यान खर्च येत आहे, रिफिलीग प्लांट आणि ग्राहक यांच्यातले अंतर किती आहे, लिक्विड प्लांट आणि रिफिलीग प्लांटमध्ये किती अंतर आहे, तसेच वाढलेली लेबर कॉस्ट यामुळे ऑक्सिजनच्या दरात वाढ झाली आहे.
ऑक्सिजनच्या दरामध्ये दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढ
हाच दर दीड ते दोन महिन्यांपूर्वी २५० ते ४६० रुपयांच्यादरम्यान होता. याचाच अर्थ गेल्या दीड ते दोन महिन्यांत ऑक्सिजनचे दर हे रिफिलीग सिलिंडरसाठी दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढले आहेत. पुणे शहरात सध्या १६ ते १८ रिफिलीग प्लांट असून या माध्यमातून शहरातील तसेच जिल्ह्यातील दवाखान्याच्या ऑक्सिजनची मागणी पूर्ण केली जात आहे. पुणे शहराचा विचार केला तर शहरातील रुग्णालयांमध्ये लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला असून, एक-दोन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक असल्याने काही रुग्णालयांमध्ये रुग्ण घेणे बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दिवसाला 250 ते 350 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी
शहरात पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये साधारण २५० मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन लागतो. परंतु, उत्पादनापेक्षा मागणी वाढल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ऑक्सिजनवरील आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तर शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा काही दिवसांपासून कमी होत आहे. रुग्ण वाढल्याने मागणी वाढली आहे. यासोबतच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या अनेक रुग्णांकरता घरीच ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकल्यानंतर ऑक्सिजनच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये प्रतिदिन ३० ते ४० टन मागणी होती. मात्र, मार्च आणि एप्रिलमध्ये ही मागणी दहापट वाढली आहे. आजमितीस पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यासाठी दिवसाकाठी ३५० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. मागील दोन दिवसांपासून हा पुरवठाच कमी झाला आहे. उत्पादकांकडून ऑक्सिजन मिळत नसल्याने पुरवठादारही हतबल झाल्याचे चित्र आहे.
मागणी वाढल्याने ऑक्सिजनच्या दरात वाढ ऑक्सिजनचे दर आणखी वाढण्याची शक्यता
अन्न व औषध प्रशासनाकडून हा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात असले, तरी पुरवठा वाढताना दिसत नाही, आगामी काळात रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर ऑक्सिजन पुरवठ्याची परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, तसेच ऑक्सिजनच्या दरात देखील मोठी वाढ होऊ शकते असे सांगितले जात आहे.
हेही वाचा -'मोदींची मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस अजून संपलेली नाही'