महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात 'नीरज चोप्रा' स्टेडियमचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्‍या हस्‍ते उद्घाटन

भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचे नाव पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला देण्यात आले आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या मैदानाचे आज (शुक्रवार) नामकरण करण्यात आले.

Inauguration of 'Neeraj Chopra' Stadium in Pune
पुण्यात 'नीरज चोप्रा' स्टेडियमचे उद्घाटन

By

Published : Aug 27, 2021, 9:15 PM IST

पुणे - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचे नाव पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला देण्यात आले आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या मैदानाचे आज (शुक्रवार) नामकरण करण्यात आले. याच मैदानावर नीरज चोप्राने कठोर परिश्रम करत मोठे यश संपादन केले. त्याच्या यशाचा गौरव म्हणून आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या या मैदानाला त्याचे नाव देण्यात आले. यावेळी लष्कर प्रमुख मनोज नरवणे हेदेखील उपस्थित होते.

पुण्यात 'नीरज चोप्रा' स्टेडियमचे राजनाथ सिंह यांच्‍या हस्‍ते उद्घाटन

'जगभरात भारताची मान उंचावली'

यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, सैन्य दलातील तेवीस जवान टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते. त्यातील काही जणांनी पदक जिंकले तर काहीनी शानदार खेळ करत संपूर्ण जगभरात भारताची मान उंचावली आहे. त्यामुळे हे सर्व खेळाडू अभिनंदनास पात्र आहेत. ज्या खेळाडूंनी आजवर सुवर्णपदक मिळवून देशाची मान उंचावली आहे त्यांच्या यादीत नीरज चोप्रा जाऊन पोहोचले आहेत. या यशाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन.

'सर्वच प्रकारच्या खेळाकडे देणार विशेष लक्ष'

पुढे सिंह असे म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात सरावाची पुरेशी संधी न मिळूनही भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार प्रदर्शन केले. यातील अनेक खेळाडूंनी अडचणींवर मात करत हे यश संपादन केले आहे. स्पोर्ट्स आर्मी इन्स्टिट्यूटच्यावतीने तर अनेक खेळाडूंच्या घरी जाऊन सरावाचे साहित्य पुरवले तर काही खेळाडूंना घराजवळच शूटिंग रेंज तयार करून देण्यात आली होती. यामध्ये योगदान देणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. यापुढच्या काळात आता सर्वच प्रकारच्या खेळाकडे विशेष लक्ष देणार आहोत. जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताला जास्तीत जास्त पदके मिळतील.

'खेळामुळेच बाल शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज बनू शकले'

ज्यावेळी आपण इतिहासाकडे पाहतो तेव्हा असे लक्षात येते की, रामायण, महाभारतात देखील अशा खेळाच्या मोठमोठ्या स्पर्धा होत असायच्या. खेळामुळेच बाल शिवाजी पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज बनू शकले. कारण खेळ खेळत असताना मनामध्ये देशप्रेमाची भावना जागृत होते.

'खेळाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका महत्त्वाची'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका खेळाच्या बाबतीत खूप महत्त्वाची आहे. त्यांनी खेळाडूंसोबत चर्चा करून, वेळ घालून, त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका देखील महत्त्वाची असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

हेही वाचा -...म्हणून अफगाणिस्तानातून विदेशी नागरिकांची विमानाने तातडी करावी लागणार सुटका

ABOUT THE AUTHOR

...view details