महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Khashaba Jadhav Sports Complex : पुण्यातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन - खाशाबा जाधव क्रीडा संकुल पुणे

भारताच्या युवा खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करता यावी, यासाठी देशभरात प्रत्येक स्तरावर क्रीडाविषयक पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती व्हायला हवी, ही बाब केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी अधोरेखीत केली.

Khashaba Jadhav Sports Complex
खाशाबा जाधव क्रीडा संकुलचे उद्घाटन

By

Published : May 28, 2022, 8:30 PM IST

Updated : May 28, 2022, 9:01 PM IST

पुणे - भारताच्या युवा खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करता यावी, यासाठी देशभरात प्रत्येक स्तरावर क्रीडाविषयक पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती व्हायला हवी, ही बाब केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी अधोरेखीत केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं उद्घाटन आणि कुस्तीपटू खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण आज केंद्रिय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. खासदार गिरीश बापट , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, अध्ययन परिषदेच्या सदस्य सुनेत्रा पवार , क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दिपक माने यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रतिक्रिया देताना केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर

आपल्याला भारतीय खेळाडूंना अधिकाधिक पदकं जिंकण्याच्यादृष्टीनं सक्षम बनवायचं आहे. मात्र त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारं, राष्ट्रीय खेळ प्राधिकरण, राज्य क्रीडा संघटना आणि क्रीडाविषयक कॉरपोरेट संस्था या सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखीत केली.

स्वतंत्र भारताला पहिलं ऑलिम्पिक वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांचे पूर्णाकृती प्रत्येकी ६ फूट उंचीचे पुतळेही या क्रीडा संकुलाच्या आवारात उभारले आहेत. हे क्रीडा संकुल उभारल्याबद्दल, आणि क्रीडा संकुलाला स्वतंत्र भारताला पहिलं ऑलिम्पिक वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचं नाव दिल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ व्यवस्थापनाचं अभिनंदन केलं. १९५२ साली झालेल्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे पुणे विद्यापीठाचेच विद्यार्थी होते .

स्वामी विवेकानंद सर्व युवांचं प्रेरणास्त्रोत आहेत. खेळलात तरच शारीरिक आणि मानसिक पातळीवर सुदृढ राहू शकतो असा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा पुतळा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारावरच त्यांचा पुतळा उभारणं ही गौरवाची बाब आहे असं ते म्हणाले.

जगभरातील विद्यापीठांचं पदक विजेते खेळाडू तयार करण्यात मोठं योगदान आहे. भारतातही अलिकडेच बंगळुरू इथं पार पडलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत ७,००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याचं आपण पाहीलं. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही चांगली कामगिरी करत, पहिल्या ५ विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलं आहे असे ठाकूर म्हणाले. या संकुलाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं क्रीडा विषयक पायाभूत सोयीसुविधा उभारण्याचं मोठं काम केलं आहे, आणि जेव्हा अशा पायाभूत सोयी सुविधा उभ्या राहतात, तर त्याच्या वापराचा खेळाडूंना लाभ होतो, म्हणूनच अशा सुविधा उभारण्याची गरज आहे असं ते म्हणाले. आपल्याकडची राज्य आणि विद्यापीठं यांच्यामध्ये खेळांबाबतची निकोप स्पर्धा असायला हवी, तरच आपल्याकडची विद्यापीठं देशासाठी अधिकाधिक पदकं जिंकून देऊ शकतील असं ते म्हणाले

महाराष्ट्र सरकारला खेलो इंडिया अंतर्गत इथल्या विद्यापीठांची स्पर्धा आयोजित करायची असेल, तर तसं करायला केंद्र सरकारची कोणतीही हरकत नाही, आमचं पूर्ण सहकार्य असेल असे ते म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या या क्रीडा संकुलाला आपल्या मंत्रालयाचं कोणतंही सहकार्य हवं असेल तर ते दिलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं.

अलिकडच्या काळात भारत खेळांचं केंद्र होऊ लागलं आहे असे सांगत ठाकूर यांनी क्रीडा क्षेत्रातल्या भारताच्या अलिकडच्या कामगिरीचाही आढावा घेतला. भारतानं टोकियो ऑलिंम्पिक मध्ये ७ पदकं, तर टोकियो पॅऱालिम्पिकमध्ये १९ पदकं जिंकली. ऑलिम्पिक प्रमाणेच पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या पदक विजेत्यांना रोख रकमेची बक्षीसं दिली गेली. कर्णबधिरांच्या आलिम्पिकमध्ये भारतानं १६ पदकं जिंकण्याची कामगिरी केली, तर थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत ७३ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतानं सुवर्णपदक मिळवलं. सिनेमा आणि क्रीडा क्षेत्र ही भारताची सॉफ्ट पॉवर आहे. याची जाणिव असल्यानंच पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच खेळाडूंशी सातत्यानं संवाद साधत असतात असं त्यांनी नमूद केलं. याच तऱ्हेनं आपण सगळ्यांनीही सतत खेळांडूंचं मनोधैर्य वाढवलं पाहीजे, त्यांना सहकार्य केलं पाहीजे, आणि त्यातूनच भारताचं क्रीडा क्षेत्रातलं स्थान उंचावायला मदत होईल असे ठाकूर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनच बदलला आहे. त्यामुळेच क्रीडा क्षेत्रात हे आमूलाग्र बदल घडू शकले, असं ते म्हणाले.

खेलो इंडिया सारखी योजना सुरु करून त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यातल्या खेळाडूंना प्रगतीची संधी मिळवून आहे असं ते म्हणाले. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा, क्रिकेटपटू कपील देव यांच्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांनी, एका चांगल्या खेळाडूची कामगिरी लाखो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरते असं त्यांनी सांगितलं.

खेळ आणि त्यासाठीच्या पायाभूत सोयीसुविधांचं महत्व लक्षात घेऊनच केंद्र सरकारने खेलो इंडिया उपक्रमाची अर्थसंकल्पीय तरतूद ५० टक्क्यांनी वाढवून ६५७ कोटी रुपयांवरून ९७४ कोटी रुपये इतकी केली आहे. २०१३-१४ च्या तुलनेतही खेळांसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद ३ पटीनं वाढवत १,२१९ कोटी रुपयांवरून ३,०६२ कोटी रुपये इतकी केली आहे. राज्य सरकारंही आपल्या खेळांसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या मंत्रालयाच्या वतीनं देशभरात खेलो इंडियाची १ हजार केंद्र तयार करायचा आपला प्रयत्न असेल. या केंद्रामध्ये प्रशिक्षक म्हणून येणाऱ्या माजी खेळाडूंना ५ लाख रुपयांचं आर्थिक सहकार्य दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आजवर ४५० केंद्रांना मान्यता मिळाली, आहे उर्वरीत केंद्रांना १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत मान्यता मिळेल असा विश्वासही त्यांनी सांगितलं.

कब्बडी प्रमाणेच खोखो, मल्लखांब, तांगटा, योगाभ्यास यांसारख्या भारतातल्या इतर पारंपरिक खेळांनाही आंतरराष्ट्रीय खेळांचं स्थान मिळवून देण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. खेळांशी संबंधित विविध स्पर्धा अधिकाधिक प्रमाणात व्हायला हव्यात, त्यातूनच खेळाडूंना स्वतःची मानसिक शारिरीक क्षमता प्रत्यक्षात तपासून पाहण्याची संधी मिळू शकते असे ते म्हणाले.

अनेक चांगल्या खेळाडूंना अभ्यासात अनेक समस्या येत असतात, मात्र शिक्षकांनी खेळाडूंना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करायला हवं आणि त्यांना अभ्यासत मदत करण्यासाठी अतिरिक्त वर्ग घ्यायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. चांगलं शिक्षण हे खेळाडूंसाठीदेखील खूप महत्वाचं असतं असं ते म्हणाले.

खेळांविषयीच्या सुविधा या केवळ खेळाडूंसाठी आहेत, हाच स्पष्ट संदेश केंद्र सरकारला द्यायचा आहे, त्यामुळेच अलिकडे दिल्लीत सनदी अधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी असलेल्या सुविधेचा गैरवापर केल्याबद्दल, केंद्रीय गृहमंत्रालयानं कठोर कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं. या सुविधांचा वापर सर्वांसाठी खुला असायला हवा, मात्र त्याचवेळी या सुविधांचा कोणी आणि कसा करावा याबद्दलचे स्पष्ट नियम असायला हवेत आणि त्याचं प्रत्येकानं पालन करायला हवं असं ते म्हणाले. खेळांशी संबंधित कोणत्याही गोष्टीमध्ये राजकीय हस्तक्षेप नसायला हवा असंही ते म्हणाले.

खाशाबा जाधव क्रीडा संकुलाविषयी -हे संकुल विद्यापीठातील २७ एकर परिसरात असून त्यामध्ये सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक, फुटबॉल, अस्ट्रो टर्फ लॉन टेनिस कोर्ट, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शुटींग रेंज, अद्यावत व्यायामशाळा आहे. याशिवाय खो-खो, कबड्डी, कॉर्फ बॉल, हॅण्डबॉल अशा मैदानी खेळाच्या क्रीडांगणांचा या संकुलात समावेश आहे. तसेच बहुउद्देशीय इनडोअर हॉल असून त्यामध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, ज्युदो, कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स आदी विविध क्रीडा प्रकार खेळता येणार आहेत. लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरणतलाव, क्रिकेट व अस्ट्रो टर्फ हॉकी क्रीडांगण तयार करण्यात येणार आहे. या अद्यावत क्रीडा संकुलामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यास मदत होणार असून यातून नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील.

Last Updated : May 28, 2022, 9:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details