पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्वतंत्र संकेतस्थळाचे आज पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामुळे घर बसल्या नागरिकांना 'ई-तक्रार' करता येणार आहे. अंध व्यक्तींना देखील या संकेतस्थळाचा वापर करता येणार आहे. pcpc.gov.in असे या संकेस्थळाचे नाव आहे. या संकेतस्थळाचा वापर मोठ्या प्रमाणात नागरिक आणि आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणी करतील, असा विश्वास पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी व्यक्त केला आहे. संकेस्थळावर जेष्ठ नागरिक हेल्प लाईन आणि निर्भया हेल्प लाईन नंबर देण्यात आला आहे.
हेही वाचा -'६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ची सुरेल सांगता
सविस्तर माहिती अशी की, १५ ऑगस्ट २०१८ ला पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळाले. मात्र, त्यानंतर अनेक अडचणींना पोलीस आयुक्त सामोरे जात आहेत. पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगाराचा विषय असो की, अपुऱ्या संख्या बळाचा, नेहमीच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाविषयी दुजाभाव करण्यात आला आहे. माजी पालकमंत्री गिरीश बापट यांनी अपुऱ्या संख्याबळा विषयी दिलेले आश्वासन हे केवळ आश्वासनच राहिले. पोलीस आयुक्तालयाला १०० नंबर मिळवण्यासाठी देखील खूप प्रयत्न करावे लागले. शिवाय पुणे पोलीस आयुक्तालयाने त्यांची वाहने काढून घेतली होती. या खडतर परिस्थितीत देखील पोलीस कर्मचारी आपली भूमिका बजावत आहेत.