पुणे -पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका मद्यपी मुलाने सतत आजारी असणाऱ्या वडिलांचा खून करून त्याचा मृतदेह तब्बल दोन दिवस घरातच ठेवला. तसेच याविषयी कुठेही वाच्यता न करण्यासाठी त्याने घरातील इतर कुटुंबीयांना धमकी दिली होती. दोन दिवसांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. रहीम गुलाब शेख (वय 67) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी नईम रहीम शेख (वय 35) याला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
'आजारपणाला कंटाळून त्याने केला वडिलांचा खून'
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नईम शेख हा वडील आणि इतर कुटुंबीयासह लोणी काळभोर परिसरात वास्तव्यास असून दुचाकी दुरुस्तीचे काम करतो. त्याचे वडील रहीम गुलाब शेख हे मागील एका महिन्यांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांची कोरोनाचाचणी देखील केली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र वडिलांच्या सततच्या आजारपणाला कंटाळून त्याने मंगळवारी वडिलांचा गळा दाबला. त्यानंतर गळ्यावर ब्लेडने वार करत त्यांचा खून केला.