बारामती - राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बारामती तालुक्यात हिवताप नियंत्रण केंद्राकडून घरटी थंडीतापाच्या रूग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.तर डेंग्यू पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णांची ‘झिका’ची देखील तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सबंधीत रूग्णांचे रक्त नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
ग्रामपंचायतस्तरावर उपाययोजना होणे गरजेचे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किटकजन्य आजार रोखण्यासाठी यंदा आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. तालुक्यात जानेवारी ते जुलै दरम्यान २१ हजार ९६७ रूग्णांच्या रक्तांचे नमुने तपासण्यात आले आहेत. तसेच शहरातील संवेदनशील ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यात ‘झिका’चे नवीन संकट समोर असल्याने डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायतस्तरावर उपाययोजना होणे गरजेचे आहे. तर शहरातील सूर्यनगरी, आमराई, सटवाजीनगर, आनंदनगर, तांदुळवाडी आदी ठिकाणी किटकजन्य आजाराचा धोका आहे.
बारामतीत डेंग्यू पॉझिटीव्ह आल्यास होणार ‘झिका’ची तपासणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किटकजन्य आजार रोखण्यासाठी यंदा आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. तालुक्यात जानेवारी ते जुलै दरम्यान २१ हजार ९६७ रूग्णांच्या रक्तांचे नमुने तपासण्यात आले आहेत.
११ ठिकाणे संवेदनशील म्हणून घोषीत
पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी किटकजन्य आजाराचे रूग्ण आढळून येतात. बारामती शहर व तालुक्यातील ११ ठिकाणे किटकजन्य आजाराबाबत संवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. पंचायत समितीच्या आरोग्य विभागांतर्गत असणाऱ्या हिवताप नियंत्रण केंद्राच्या माध्यमातून वर्षभर किटकजन्य आजारांचे सर्वेक्षण सुरू असते. जानेवारी महिन्यापासून हिवताप नियंत्रण केंद्राचे आरोग्य सेवक,आरोग्य सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदींच्या माध्यमातून कोरोनासोबत किटकजन्य आजाराचे सर्वेक्षण सुरू केले. त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून थंडीतापांच्या रूग्णांची घरटी तपासणी करण्यात आली. यामध्ये आवश्यक रूग्णांच्या रक्ताचे नमुनेदेखील तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले.
आतापर्यंत तालुक्यात ११ डेंगूचे रूग्ण
जानेवारी २०२० पासून बारामती तालुक्यात हिवतापाचा रूग्ण आढळलेला नाही. २०१९ मध्ये बारामती तालुक्यात हिवतापाचे ७ रूग्ण अढळून आले होते. तर जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत तालुक्यात ११ डेंगूचे रूग्ण अढळून आले आहेत. बारामतीत दरवर्षी डेंग्यू, चिकन गुणिया आदी विषाणूजन्य आजाराच्या साथी कमीजास्त प्रमाणात पसरतात. सलग दीड वर्ष असलेल्या कोरोना महासाथीमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक,आरोग्य सेवक आदींच्यामाध्यमातून लोकसहभागातून गावागावात जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. यासाठी हिवताप नियंत्रण केंद्राकडून ग्रामस्थांसाठी माहितीपत्रकाचे घरटी वाटप करण्यात येत आहे.
स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहन
घर परिसरात डासांची पैदास होणार नाही यासाठी स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. आपल्या गावामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
हेही वाचा -संसदेत हजर राहण्यासाठी भाजपच्या खासदारांना व्हीप, 127 व्या घटनादुरूस्ती विधेयकावर आज चर्चेची शक्यता!