पुणे : आज शिवसेना खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांना ईडीने ( Action by ED ) ताब्यात घेतले आहे. संसदेत अधिवेशन सुरू असताना एखाद्या खासदाराला केंद्रीय यंत्रणेकडून अटक होऊ शकते का, अशी चर्चा सध्या सुरू आहे. यावर घटना अभ्यासक आसीम सरोदे ( Constitutional Scholar Asim Sarode ) यांना विचारले असता ते म्हणाले की, खासदार हे पद घटनात्मक पद नसून, सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आहे. जर खासदाराने चूक केली असेल, तर नक्कीच त्यांना अटक होऊ शकते, असे यावेळी सरोदे म्हणाले.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कारवाई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. या प्रकरणात मनीलॉन्डरिंग झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला असून, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे.
अनेक दिवसांपासून नोटीस येत असतानाही टाळाटाळ : गेल्या बऱ्याच दिवसांपासून संजय राऊत यांना ईडीच्या नोटीस येत होत्या. त्यांच्यावर कारवाई सुरू होती. परंतु, वारंवार सूचना देऊनसुद्धा संजय राऊत टाळाटाळ करीत होते. त्यामुळे आज ईडीने त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली आणि तब्बल 6 तास चौकशी झाल्यानंतर राऊत यांना अटक करण्यात आली आहे.
आघाडीतील या नेत्यांना झाली होती अटक :महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शिवसेनेतील अनेक नेत्यांना ईडीच्या नोटिसा गेल्या होत्या. राष्ट्रवादीच्या नवाब मलिक, अनिल देशमुख यांना ईडीच्या कारवाईनंतर अटक करण्यात आली होती. नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती अटक झाली होती. त्याचप्रमाणे आता शिवसेना नेते संजय राऊत पत्राचाळप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवाब मलिकांवरील आरोप : नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
हेही वाचा :MP Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत अखेर ईडीच्या ताब्यात; शिवसैनिक आक्रमक