पुणे - रिक्षा चालकाने रिक्षात विसरलेली पर्स आणि त्यातील २५ हजार रुपये प्रामाणिकपणे प्रवाशाला परत केल्याची घटना पुण्यात घडली आहे. दशरथ कुरकुटे (७८) असे प्रामाणिक रिक्षा चालकाचे नाव असून सविता डफाळ, असे प्रवाशी महिलेचे नाव आहे.
घटनेबाबत माहिती देताना रिक्षा चालक आणि पोलीस रिक्षात राहिलेली प्रवाशी महिलेची पर्स दशरथ यांनी सांगवी पोलीस ठाण्यात जाऊन जमा केली. या पर्समध्ये २५ हजार रुपये होते. दरम्यान, पैसे हरवल्याने सविता या घाबरल्या होत्या. मात्र, पैसे मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. त्यांनी रिक्षा चालक यांना बक्षीस म्हणून ५०० रुपये दिले.
काय आहे घटना -
सविता यांनी रिक्षा चालक दशरथ यांच्या रिक्षातून साई चौक येथून पिंपळे गुरव बसस्थानकापर्यंत प्रवास केला. मात्र, इच्छित स्थळी उतरत असताना त्या पर्स रिक्षात विसरल्या. दरम्यान, दशरत यांनी पर्स विसरली आहे, हे सविता यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या फोनवर बोलत तशाच पुढे निघून गेल्या. त्यानंतर काही वेळाने पर्स रिक्षात राहिल्याचे सविता यांना समजले. पण तोपर्यंत रिक्षा चालक दशरथ हे सांगवी पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांनी पर्समध्ये २५ हजार रुपये असून ते प्रवाशी महिला रिक्षात विसरली आहे, असे सांगितले. रिक्षा चालक यांचा शोध सविता या घेत होत्या त्यांनी इतर रिक्षा चालकाकडून त्यांचा नंबर मिळवत त्यांना संपर्क केला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात असल्याचे सविता यांना सांगितले. हे ऐकून त्यांच्या जिवात जीव आला. सविता यांना त्यांची २५ हजार रुपयांची रक्कम पोलीस अधिकारी यांनी दशरथ यांच्या समोर परत केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक भुजबळ यांनी प्रामाणिकपणा दाखवणारे दशरथ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.