पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष सर्वच सण उत्सव हे निर्बंधात साजरे करावे लागले. यंदा मात्र निर्बंधमुक्त करण्यात आल्याने यंदाचे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नुकतच झालेल गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे.आणि येणारा नवरात्र उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.यंदाच्या नवरात्र उत्सवानिमित्त (Navratri 2022) पुण्यातील चतु:श्रुंगी मंदिराच काय आहे इतिहास? (history of ChatuShrungi Temple in Pune) हे आज आपण जाणून घेऊया.
प्रतिक्रिया व्यक्त करतांना मंदिराचे विश्वस्त व पुजारी
काय आहे इतिहास :इ.स. १८व्या शतकात पुण्यात पेशव्याची सत्ता होती. दुर्लभशेठ महाजन नावाचे एक पेशव्यांचे सावकार होते. हे महाजन वणीच्या सप्तशृंगी देवीचे परमभक्त होते. जास्त वय झाल्यामुळे त्यांना वणी येथे जाणे अशक्य झाले व याचे त्यांना खूप दुःख होऊ लागले. याच वेळी देवीने त्यांना दृष्टांत दिला. दृष्टांतात सांगितल्या ठिकाणी उत्खनन करुन पाहिले असता; देवीची एक स्वयंभू मूर्ती दिसली. आपण आज जी मूर्ती पहात आहोत ती याच स्वरुपात आढळली. नंतर या मूर्तीवर शेंदूराचा लेप लावून डोळे बसविण्यात आले. आणि तेव्हा पासून नवरात्र उत्सव हे मंदिरात होऊ लागले.आणि आज पाहता पाहता लाखो भक्त नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
म्हणून चतुःशृंगी नाव देण्यात आले :चतुःशृंगी हा संस्कृत शब्द असून; पूर्वी याठिकाणी चार डोंगर होते म्हणून या देवीला चतुःशृंगी असे नाव मिळाले. त्यावेळी जंगली प्राण्यांचा धोकादायक वावर असलेली ही जागा होती व पायऱ्या, वीज, पाणी यांची सोय नव्हती. कालांतराने दुर्लभशेठ यांच्या नातवाने देखभाल करण्यासाठी हे देवस्थान दस्तगिर गोसावी यांच्या ताब्यात दिले. साधारणपणे १८२० च्या सुमारास याची जबाबदारी अनगळांकडे आली. त्यानंतर देवळाची व आसपासची १६ एकर जागा अनगळांनी इ.स. १८७८ साली शबहिरट यांच्याकडून विकत घेतली. आजही अनगळांची ५वी पिढी या देवीची सेवा करत आहे. त्यावेळी हे देऊळ गावाबाहेर असल्यामुळे भक्तांची संख्या खूप कमी होती. १९६१ च्या पानशेतच्या पुरानंतर पुण्याची वाढ होऊ लागली व रस्त्यांची सोय झाली. याचवेळी पिंपरी चिंचवड येथे कारखाने सुरु झाल्यामुळे बाहेरच्या प्रांतातून लोक आले. या बाहेरुन आलेल्या मंडळींनीसुद्धा चतुःशृंगी देवी ही त्यांची माताच मानली व ते नित्त नियमाने दर्शनाला येऊ लागले. देवीच्या भक्तांमध्ये हिंदू तर आहेतच पण, कित्येक ख्रिश्चन व मुसलमान देखील या देवीचे भक्त आहेत.
पुणे शहराची अधिष्ठात्री देवताअश्विन महिन्यात भरणारी देवीची यात्रा ही पुण्याचा मानबिंदू आहे. पूर्वी फार मोठ्या प्रमाणावर भरत असणारी ही यात्रा आजूबाजूची जागा कमी झाल्यामुळे व दहशतवादाच्या सावटाखाली या यात्रेचे स्वरुप आता कमी झाले आहे. नवरात्रात २४ तास या देवीचे दर्शन होऊ शकते, हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. अशी ही नवसाला पावणारी देवी असून पुणेकरांची श्रद्धा, भक्ती व विश्वास आजही टिकून आहे व पुढेही टिकून राहणारच आहे. या देवीची होम-हवन, घटस्थापना इ. धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य नारायणराव कानडे गुरुजी करीत असून; त्यांच्या देखील ४ पिढ्या या देवीच्या सेवेत आहेत. पुणे शहराची अधिष्ठात्री देवता म्हणून श्री चतुःशृंगी देवीचे नाव घेतले जाते.
नवरात्री महोत्सवाची पुर्वतयारी पुर्ण : दोन वर्षानंतर यंदा निर्बंध मुक्त नवरात्र उत्सव होत असल्याने; मोठ्या प्रमाणात यंदाच्या नवरात्र उत्सवासाठी मंदिर प्रशासनासाठी तयारी करण्यात येत आहे. नवरात्र उत्सवाच्या वेळी अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येणार आहेत. आणि मग देवीची घटस्थापना करण्यात येणार असून, दररोज सकाळी दहा आणि रात्री आठ वाजता महाआरती करण्यात येणार आहे. मंदिर 24 तास भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहणार आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून भाविकांचा मंदिर परिसरात यात्रेसह विमा काढण्यात येणार आहे. पोलीय यंत्रणा, खासगी सुरक्षा रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परिसरात २१ सीसीटीव्हींची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. आपत्कालिन व्यवस्थापन आणि उपचारांसाठी डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहे.
मंदिर आणि परिसराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्तनपानासाठी दोन हिरकणी कक्ष, किटकनाशकांची फवारणी, कचरा संकलन, स्वच्छता, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य वाहनतळ व्यवस्था, अग्निशमन दलाची गाडी, गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी बॅरिकेटस आदी व्यवस्था लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.