पुणे -नवरा बायकोत कधी कशावरून भांडण होईल, याचा काही नेम नाही. पुण्यात एक अशी घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये व्हॉट्सअॅपवरून नवरा बायकोत भांडणाला सुरुवात झाली. अन् निमित्त काय होते तर म्हणे नवरा व्हॉट्सअॅपच्या डीपीला माझा फोटो ठेवत नाही. शेवटी हे प्रकरण पुणे पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये गेले. मग पोलिसांनीही नवरा-बायको दोघांनाही एकत्र बसवले आणि यावर तोडगा काढला.
दोन वर्षांपूर्वी झाले लग्न
याविषयी अधिक माहिती देताना भरोसा सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे म्हणाल्या, की काही दिवसांपूर्वी एका उच्चशिक्षित महिला आमच्याकडे आली होती. आल्यानंतर तिने आपली तक्रार सांगण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, दोन वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. मला वडील नाहीत, त्यामुळे आई आणि लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांना सांभाळण्यासाठी पतीही मदत करतो. पतीकडून मला कसलाही त्रास नाही. पण पती व्हॉट्सअॅपला माझा फोटो डीपी ठेवत नाही म्हणून मी त्याच्यावर नाराज आहे, असे त्या महिलेने सांगितले. त्यानंतर हा सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आला.
'याचा अर्थ तो तुझ्यावर प्रेम करतो'
पोलिसांनी या महिलेच्या पतीलाही बोलावून घेतले. पोलिसांना सांगताना तो म्हणाला, की आम्हा पती-पत्नीत कुठलाच वाद नाही. पत्नीची आवड-निवड, तिला काय हवे नको ते मी नेहमी पाहतो. तिची काळजी घेतो. सासूबाईंची काळजी घेतो, मेहुणीच्या शिक्षणाचाही खर्च उचलतो. तरीही माझी पत्नी केवळ व्हॉट्सअॅपला माझा फोटो डीपी म्हणून का ठेवला नाही या कारणावरून माझ्याशी हुज्जत घालते. या क्षुल्लक कारणावरून आपसात भांडण होत राहते. अशा वेळी मला काय करावे ते सूचत नाही. या दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर भरोसा सेलच्या महिलांनी तक्रारकर्त्या महिलेचे समुपदेशन केले. पती तुझ्यासह तुझी बहीण आणि आईचीही काळजी घेतो. अडीअडचणीला त्यांच्या मदतीला धावून जातो. याचा अर्थ तो तुझ्यावर प्रेम करतो. केवळ व्हॉट्सअॅपला डीपी ठेवला तरच प्रेम करतो, असे होत नाही. प्रेम हे इतरांना दाखवण्यासाठी नसते तर ते आपल्या रोजच्या वागण्या-बोलण्याच्या कृतीतून व्यक्त होत असतं. याची जाणीव त्या महिलेला पोलिसांनी करून दिली.. पोलिसांनी केलेल्या समुपदेशानंतर या महिलेला आपली चूक उमगली.. त्यानंतर पुन्हा कधी असे विचार मनात आणणार नाही, असे सांगत ही महिला तिथून निघून गेली.