पुणे- मागील दोन दिवसांपासून पुणे आणि परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर मध्य वस्तीतील काही रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शहर आणि उपनगरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे रेनकोट, छत्री, जर्किन घेऊनच नागरिकांना घराबाहेर पडावे लागले. दोन दिवस सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी पातळीत अर्धा टीएमसी वाढ झाली आहे.
चार ही धरणात अर्धा टीएमसीपेक्षा वाढ..
खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. एक जून पासून आज अखेर टेमघर ३७०, पानशेत २८९ व वरसगावला २८४ तर खडकवासला धरणात १५३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामुळे चार ही धरणात मिळून अर्धा टीएमसीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. या चार धरणात मिळून ७.४३ टीएमसी म्हणजे २५.४८ टक्के पाणीसाठा झाला आहे.
अनेक ठिकाणी झाडे पडून दुचाकीने नुकसान..
शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काही ठिकाणी झाडे पडून अनेक दुचाकींचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी रस्त्याच्या कामामुळे खणून ठेवलेल्या खड्डयांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.