पुणे - पक्षीय निष्ठा कायम राखत सर्व राजकीय पक्षातील व्यक्तींशी सौहार्दता जपणे ही महाराष्ट्राची आणि खास करून पुण्याची राजकीय संस्कृती आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नेते अंकुश काकडे लिखित आणि उत्कर्ष प्रकाशनातर्फे प्रकाशित 'हॅशटॅग पुणे' ( Hashtag Pune Book Release Ceremony ) या पुस्तकाचे प्रकाशन आज ( रविवारी ) शरद पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात झाले, त्यावेळी ते बोलत होते.
'मतभिन्नतेचे रूपांतर मनभेदमध्ये करु नका' :राजकारणात मतभेद आणि वैचारिक भिन्नता असते. परंतु त्या मतभेदांचे आणि मतभिन्नतेचे रूपांतर मनभेदामध्ये होता कामा नये. राजकीय नेतृत्व आणि कार्यकर्त्यांनी सुसंस्कृत भूमिका घेऊन आदर्श प्रस्थापित केला पाहिजे. ज्या कोणाला पुण्याची नस आणि पुण्याची गुणसुत्रे जाणून घ्यायची आहे, त्यांनी हे पुस्तक आवर्जुन वाचावे. या पुस्तकात पुण्याच्या अमृततुल्य पासून तर पुण्यात साजरा होणारा गणेशोत्सव, उर्स या सगळ्यासह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आढावा घेतला आहे. हे पुस्तक म्हणजे पुण्याचे सर्वांगिण दस्तावेजीकरण आहे. पुणे झपाट्याने बदलत असून शैक्षणिक संस्था, आयटी हब, औद्योगीकीरण, उद्योग आणि रोजगाराच्या संधी यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.