पुणे -सजग नागरिक हे मुंबईपाठोपाठ पुण्यातील नागरिकांचेही वैशिष्ट्य आहे. याच पुण्यातल्या एका आजीबाईंचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. पुण्यात वाहतूक कोंडी कधीकधी इतकी प्रचंड असते की पंधरा मिनिटांचे अंतर कापण्यासाठीही दोन तास लागतात. अशाच वाहतूक कोंडीतून या आजींनी वाट काढली. त्या कोण आहेत याचा शोध ईटीव्ही भारतने घेतला आहे.
पुण्यात वाहतूक सुरळीत करणाऱ्या 'त्या आजीचा' लागला शोध पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या दीपा लोहटेकर
पुण्यातील त्या वाहतूक कोंडीवर वाट काढणाऱ्या आजींचे नाव आहे, दीपा लोहटेकर. या आजी पुण्यातील कर्वे नगर परिसरात राहतात. त्यांच्याशी त्या दिवशी नेमकं काय झाल हे विचारल्यानंतर त्यांनी तेव्हाची वास्तव हकीकत सांगितली आहे.
...आणि त्या रुग्णवाहिकेला जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला
त्या दिवसाच्या प्रसंगाबाबत सांगताना आजी म्हणाल्या, की त्या दिवशी मी रिक्षाने मेहंदळे गॅरेज परिसरातून जात होते. तेव्हा रस्त्याच्या दोन्ही लेनमध्ये वाहतुकीची खूप कोंडी झाली होती. सर्व जण आपली गाडी पुढे जावी यासाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत होती. मात्र या गर्दीत दोन रुग्णवाहिकाही अडकून पडल्या होत्या. त्यामुळे मी रिक्षातून उतरून वाहतूक कोंडी सोडवण्यास सुरवात केली. नंतर तेथील वाहनचालकांनीही मला चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे काही मिनिटांतच वाहतुकीची कोंडी सुटली आणि रुग्णवाहिकांना जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला.
‘पुणे तिथे काय उणे’ असे कायमच म्हटले जाते. एका अज्ञात व्यक्तीने आजींचा हा वाहतूक सोडवितानाचा व्हिडिओ काढला होता. थोड्याच वेळात तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाला. अनेकांनी त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक केले. मात्र जे या आजींना करावेसे वाटले ते इतर कोणालाही का करावेसे वाटले नाही, हाही प्रश्न आहे, पण शेवटी पुणे तेथे काय उणे हेच खरे.