पुणे -आयोध्येमध्ये एक हजार वर्षे टिकेल, असे श्रीरामाचे मंदिर उभारणार असल्याचे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांनी सांगितले. येत्या 15 जानेवारीपासून राम मंदिरासाठी लागणारा निधी गोळा करण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
15 जानेवारीपासून निधी संकलनाला सुरुवात
अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी सर्वसामान्य नागरिकांचा हातभार लागावा यासाठी देशभरातील नागरिकांकडून निधी गोळा करण्यात येणार आहे. मकरसंक्रांती पासून म्हणजेच 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत हा निधी गोळा केला जाणार आहे. यासाठी देशभरात दीड लाख स्वयंसेवक काम करणार आहेत. देशातील चार लाख गावातील 11 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे नियोजन या अभिनमार्फत करण्यात आले आहे. यासाठी 1000, 100 आणि 10 रुपयांचे कुपन तयार करण्यात आले आहेत. या कंपनीच्या माध्यमातून हा निधी गोळा केला जाणार आहे.
महाराष्ट्रातील 45 हजार गावांतपर्यंत पोहोचण्याचे नियोजन
संकलन समर्पण अभियानाद्वारे महाराष्ट्रातील 45 हजार गावातील अडीच कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व गावातील कुटुंबापर्यंत पोहोचून हा निधी संकलन करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असल्याचे गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले.