..तर दुकाने 7 पर्यंत सुरु करू, पुणे व्यापारी महासंघाचा सरकारला इशारा
दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिलपासून राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील बाकी सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही. एकीकडे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना हे निर्बंध लादले जात असल्याने व्यापारी वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे.
पुणे -दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिलपासून राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील बाकी सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही. एकीकडे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना हे निर्बंध लादले जात असल्याने व्यापारी वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करीत व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावा, यासाठी येत्या मंगळवार ३ ऑगस्ट रोजी पुणे शहरातील सर्व व्यापारी विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहेत, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.
अन्यथा दुकाने 7 वाजेपर्यंत सुरू ठेवणार -
या आंदोलनानंतर सरकारने दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात योग्य निर्णय घेतला नाही, तर बुधवार ४ ऑगस्टपासून पुणे शहरातील सर्व दुकाने सायं. ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येतील, अशा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.