पुणे - गणेश महिमा या मालिकेत आपण गणपतीचे दहावे नाव सिध्दीविनायक कसे पडले? या नावामागे काय आख्यायिका आहे आणि तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक टेकडीची काय आख्यायिका आहे ते जाणून घेणार आहेत. याबाबतचा ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट...
भगवान विष्णूंना सिध्दी पात्र झाली -
मुद्गल पुराणात असे वर्णन केलेले आहे की सृष्टीच्या सुरुवातीस, जेव्हा विष्णू त्यांच्या योगनिद्रेत होते. त्यावेळी विष्णूच्या नाभीतून एक कमळ उगवले. सृष्टीचा निर्माता-देव ब्रह्मा याच कमळातून उद्यास आले. ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली असतानाच, मधु आणि कैटभ हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणीतून उद्भवले. या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टिनिर्मितीच्या प्रक्रियेस अडथळा आणण्यास सुरुवात केली. ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करण्यास भाग पाडले. समोरील विनाशकारी दानवांसोबत विष्णू नारायण लढाई लढले खरे. पण त्या दानवांचा पराभव करू शकले नाहीत. मग त्यांनी यामागील कारण महादेवाला विचारले. महादेवाने विष्णूला सांगितले की, ते लढाईआधी, शुभ कार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा, विघ्ने दूर करणाऱ्या देवतेला गणेशाला वंदन करायला विसरलात आणि त्याचमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. अखेरीस, विष्णूंनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला मंत्रमुग्ध केले. ("ओम श्री गणेशाय नमः") गणपती प्रसन्न झाल्याने त्यांनी विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी ("शक्ती") प्राप्त करून दिली. ती मिळवून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारले. विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धी घेतली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाते.