पुणे- आधीच कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेल्या लॉकडाऊनमुळे मुर्तिकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच पुन्हा शासनाने निर्बंध लागू केल्यामुळे मुर्तिकारांना यंदाही मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
शाडूच्या मूर्तींकडे व्यवसायिकांनी फिरवली पाठ..
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्या संदर्भात मार्गदर्शन सूचना गृह विभागाने जारी केल्या आहेत. तशीच नियमावली मुर्तिकारांच्या संदर्भातही जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींवर बंदी आणली होती. त्यामुळे यावर्षी शाडूच्या मुर्ती मुर्तिकारांना बनवाव्या लागत आहेत. शाडूच्या मूर्ती बनवायला किचकट आणि वेळखाऊ असतात. त्यामुळे यंदा कमी प्रमाणात शाडूच्या मूर्ती बनवण्यात आल्या आहे. मात्र, कोरोनामुळे व्यावसायिक मुर्ती खरेदीकडे पाठ फिरवत असल्याने यंदा देखील मूर्तिकारांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.
मुर्तिकारांना यंदाही कोरोनाचा फटका.. वर्षभरात फक्त 150 मुर्ती तयार..
गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तींना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. पुण्यातील मूर्तिकारांनी शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला असून वर्षभरात फक्त 150च मुर्ती बनवल्या आहेत. एकेकाळी दिवसाला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 10 मुर्ती तयार होत होत्या त्या आता केवळ १ ते २ होत आहेत. शाडूच्या मूर्ती नाजूक असल्याने मूर्ती तुटण्याची जास्त शक्यता असते. त्या तुलनेने पीओपीच्या मूर्ती या हाताळण्यास सोप्या असतात आणि ते तुटत ही नाही असे यावेळी मूर्तिकार हर्षल पवार यांनी सांगितले.
यंदाही बसणार आर्थिक फटका..
मागच्या वर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणि उशिरा जाहीर केलेल्या नियमावलीमुळे राज्यातील मूर्तिकारांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. मुर्तिकारांकडे मुर्ती पडून राहिल्या. यंदा मात्र थोडी सूट मिळेल आणि व्यवसाय सुरू होईल, अशा आशेवर असलेल्या मुर्तिकारांना सलग दुसऱ्या वर्षी आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. शासनाने नियमावलीत मूर्ती बसवण्यापेक्षा सुपारी, तांबे, पितळाच्या मुर्तीचे पूजन करा, असं म्हटलंय. शासनच जर असं म्हणत असेल तर आमच्या सारख्या मूर्तिकारांनी करायचं? असा प्रश्न मुर्तिकार विचारत आहेत. पुन्हा पुन्हा लॉकडाऊन लागत असल्याने मुर्तीसाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध होत नाहीए, याचा फटका मुर्ती तयार करताना बसतोय. शिवाय ज्या मुर्ती तयार केल्या आहेत, त्या तरी विकल्या जातील की नाही, अशी शंका असल्याचे पवार यांनी सांगितले.
यंदा मूर्ती महागणार..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन आणि त्यात कमी प्रमाणात होणारे उत्पादन यामुळे आधीच व्यवसाय तोट्यात आहे. त्यात शासनाने शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी सांगितलं असल्याने या मूर्ती बनवण्यासाठी खूप खर्च लागतो आहे. त्यामुळे यंदा मूर्तींच्या किंमतीत देखील वाढ होणार आहे. पीओपीची दोन फुटाची मूर्ती जी दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत मिळत होती; तेवढीच शाडूची मूर्ती ही 3 ते 4 हजारापर्यंत मिळणार आहे. त्यातच आता नागरिक शाळूच्या बनवलेल्या मूर्त्यांना किती प्रमाणात प्रतिसाद देतील, ते पाहणंही महत्त्वाचं आहे. कारण जर नागरिकांनी या मूर्तींकडे पाठ फिरवली, तर मूर्तीकारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे.