पुणे - शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा गणेशोत्सव साध्यापणाने साजरा केला जाणार आहे. त्यासाठी आज (गुरुवार) झालेल्या बैठकीत काही नियम अटी घालून दिल्या गेल्या आहेत. पुण्याचा गणेशोत्सव भव्य देखाव्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, यावर्षी पुण्यात कोणत्याही गणपती मंडळासमोर देखावे उभे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज (गुरुवार) गणपती मंडळ, महापालिका अधिकारी, महापौर यांसह पोलीस अधिकारी यांची पुण्यातील गणेशोत्सवाबाबत एकत्रित बैठक पार पडली.
महापौर मुरलीधर मोहोळ आणि पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची प्रतिक्रिया... गणेश मंडळांना यावर्षी गणपती बसवण्यासाठी कुठलीही पोलीस परवानगी घ्यावी लागणार नाही. ज्या मंडळाना २०१९ ची परवानगी असेल त्यानुसार तुम्ही गणपती बसवू शकता. तसेच, २०२१ ला ही त्या आधारे पोलीस परवानगी देण्यात येईल. यावेळी शहरात गणपती प्रतिष्ठापना आणि विसर्जन या दोन्ही मिरवणुका काढता येणार नाहीत. शहरात अजून कोरोना प्रादुर्भाव आहे. त्यामुळे शासन नियमानुसार उत्सव साजरा केला जाईल, असे पोलीस प्रशासन आणि महापालिकेकडून सांगण्यात आले.
हेही वाचा -लॉकडाऊन, त्यात नवीन नियमावली; गणपती मूर्ती कशा विकायच्या? पुण्यातील मूर्तीकारांचा सवाल
मंडळे दिलेल्या नियमानुसार, गणेशोत्सव साजरा करण्यास तयार आहेत. मात्र, छोट्या मंडळाना १० बाय १० मंडप परवानगी द्यावी. तसेच काही अर्थसहाय्य महापालिकेने करावे, अशी मागणी मंडळाने केली आहे. शहरात कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आपण मागील काळात प्रत्येक सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले आहेत. तसाच यंदाचा गणेशोत्सवदेखील साध्या पद्धतीने साजरा करुयात, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गणेश मंडळांना केले आहे.
दरवर्षी आपण सर्वजण गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. मात्र, यंदा आपण कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून कोरोनासारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या आजाराची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. हे लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करुयात, गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच कोणत्याही स्वरुपाच्या मिरवणुका काढण्यात येणार नसून भाविकांना डिजिटलच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करावी. त्याचबरोबर गणेशमूर्तींचे विसर्जन मंडळांच्याजवळच, तर घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा -मुंबईत अतिवृष्टी, गणपती उत्सवाला एसटीने गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना फटका
शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि सर्व संस्था रात्रंदिवस काम करत आहेत. या कोरोनाच्या काळात आलेले सण-उत्सव आपण साध्या पद्धतीने साजरे केले आहेत. त्याचप्रमाणे आता गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करावा. शहरात ज्या मंडळाची गणेश मंदिरे असतील त्यांनी तिथेच उत्सव साजरा करावा किंवा ज्यांची मंदिरे नसतील त्यांनी छोटासा मांडव उभारून हा उत्सव साजरा करावा. पण मी तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो की, यंदाचा गणेशोत्सव मंदिरातच साजरा करूया, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे केले.