पुणे- अनाथांची माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे काल रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज त्यांच्यावर पुण्यातील ठोसर पागा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. पण त्याआधी पुण्यातील मांजरी येथील सन्मती बाल निकेतन संस्था येथे माईंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. संस्थेतील मुलांनी माईंचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर राज्यभरातील आलेल्या नागरिकांनी अंतिमदर्शन घेतले. महानुभाव पंथीय रितीरिवाजानुसार अंत्यविधी सोहळा पार पडला. त्यानंतर पोलिसांच्यावतीने मानवंदना देण्यात आली.
- सिंधुताईंचं लहानपण -
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला होता. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. घरातील गुरे राखायला गेलेल्या सिंधुताई शाळेत जाऊन बाहेर बसायच्या आणि शिकायच्या. चौथीपर्यंत त्यांनी आपलं शिक्षण पुर्ण केलं होतं. त्यांचा विवाह देखील वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी यांच्यापेक्षा 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. त्यांचं वैवाहिक जीवन देखील अतिशय कठीण गेलं. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली होती.
- ममता बाल सदन संस्थेची स्थापना -
अशा खडतर परिस्थितीतून अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.
- सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या -
बाल निकेतन हडपसर, पुणे
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदर
अभिमान बाल भवन, वर्धा
गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
ममता बाल सदन, सासवड
सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था
त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. मागच्याच वर्षी त्यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. २०१२ साली महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आले आहे. सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
- आतापर्यंत मिळालेले पुरस्कार -
पद्मश्री पुरस्कार (२०२१)