पुणे - अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे किती महाग पडू शकते, याचे आणखी एक उदाहरण पुणे शहरातून समोर आले आहे. फेसबुक या सोशल मीडिया साईटवर एका तरुणाने 60 वर्षीय महिले सोबत मैत्री करून तिला तब्बल चार कोटी रुपयांनी गंडा घातला. महागडे गिफ्ट देण्याच्या आमिषाने आरोपीने या महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महिलेला फेसबुक फ्रेण्डशीप भोवली; गिफ्ट देण्याच्या बहाण्याने चार कोटी रुपये उकळले - cyber crime
फेसबुक या सोशल मीडिया साईटवर एका तरुणाने 60 वर्षीय महिलेसोबत मैत्री करून तिला तब्बल चार कोटी रुपयांनी गंडा घातला. महागडे गिफ्ट देण्याच्या आमिषाने आरोपीने या महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला प्रतिष्ठित व्यक्ती असून एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करते. काही महिन्यांपूर्वी त्यांना फेसबुकवर एका अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांच्यात मेसेंजरवर चॅटिंग सुरू झाली. समोरील व्यक्तीने आपण ब्रिटनमध्ये राहत असून एका मोठ्या कंपनीत काम करत असल्याचे सांगितले. या महिलेचा विश्वास संपादन करून त्यांनी मोबाईल नंबर घेतला आणि व्हाट्सअपवर त्यांचे चॅटिंग सुरू झाले.
सप्टेंबर महिन्यात महिलेचा वाढदिवस होता. यावेळी आरोपीने त्यांना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून आयफोन आणि इतर काही वस्तू पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन करून आयफोन पाठवला असून तो दिल्लीतील कस्टम विभागात अडकून पडल्याचे आरोपीने सांगितले. आयफोन सोडवून घेण्यासाठी काही पैसे भरावे लागतील असे सांगत आरोपीने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात वेळोवेळी लाखो रुपये भरण्यास भाग पाडले. आरोपीच्या सांगण्यावरून महिलेने आजवर 25 बँकेच्या वेगवेगळ्या 67 बँक खात्यात 3 कोटी 97 लाख 75 हजार रुपये भरले. इतके पैसे भरूनही आयफोन आणि इतर वस्तू न मिळाल्याने त्यांनी अधिक चौकशी केली. दरम्यान त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस अधिक तपास करत आहे.