पुणे -पोलिसांनी एका अशा तरुणाला अटक केली, ज्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवत एक दोन नव्हे तर तब्बल 53 तरुणींची फसवणूक केली होती. यातील चार मुलींसोबत तर त्याने लग्न करून खोटा संसारदेखील मांडला होता. ह्याच तरुणींच्या नातेवाईकांना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांचा गंडादेखील घातला होता. योगेश दत्तू गायकवाड (रा. कन्नड, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विश्वास संपादन केला
काही दिवसांपूर्वी फिर्यादी तरुणी ही आईच्या उपचारासाठी बिबवेवाडी परिसरातील एका रुग्णालयात आली होती. आईची भेट घेऊन परत जाण्यासाठी ती एका बस स्टॉपवर थांबली होती. यावेळी आधार कार्ड पडल्याचे नाटक करून आरोपीने तिच्यासोबत ओळख वाढवली. तिचा मोबाइल नंबर घेत तिच्याशी संपर्क सुरू ठेवला. त्यानंतर आपण सैन्यदलात नोकरीला असल्याचे सांगून फिर्यादी आणि फिर्यादीच्या आईचा विश्वास संपादन केला. फिर्यादीचा विश्वास बसावा, यासाठी आरोपीने बनावट ओळखपत्रदेखील दाखवले होते.