महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. अरूण निगवेकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन - अरूण निगवेकर निधन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पंधरावे कुलगुरू म्हणून डॉ. अरूण निगवेकर यांनी १९९८ ते २००० मध्ये काम पाहिले. देशातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनासाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल अॅसेसमेंट अॅण्ड अॅक्रेडिटेशन कॉन्सिलचे अर्थात नॅकचे संस्थापक -संचालक होते.

डॉ. अरूण निगवेकर
डॉ. अरूण निगवेकर

By

Published : Apr 23, 2021, 11:02 PM IST

पुणे-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. अरूण निगवेकर यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. काही
वर्षापूर्वी त्यांना ब्रेन कॅन्सर झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.

प्रदीर्घ आजारानंतर डॉ. अरूण निगवेकर यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. डॉ. निगवेकर हे २०००-२००५ या दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर होते. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पंधरावे कुलगुरू म्हणून त्यांनी १९९८ ते २००० काम पाहिले. देशातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनासाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅकचे संस्थापक -संचालक होते.

हेही वाचा-पुण्यात तोडल्या धर्माच्या भिंती! ४० मुस्लिमांनी केले हजारो मृतदेहांवर अंत्यसंस्कार

विदेशातील विद्यापीठातही अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन

पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आणि पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. तसेच पुण्यात सेंटर फॉर ऍडव्हान्स स्टडीज फिजिक्सची स्थापना केली. यूनिवर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि कॅनडा येथील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टन ऑटॅरिओ या ठिकाणी त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम पाहिले. निगवेकर यांना विविध नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

हेही वाचा-ऑक्सिजन, रेमडेसिवीर वाहतूक विमानाने करा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरूण निगवेकर यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरूण निगवेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशातील शिक्षणाचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला डॉ. निगवेकर सरांचे कार्य कायमच प्रेरणा देत राहील, असे उपमुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

महान वैज्ञानिक,शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरूण निगवेकर यांच्या निधनामुळे भारतातील उच्च शिक्षणात गुणवत्ता व आधुनिकतेचा प्रवाह आणणारा महाराष्ट्रपुत्र गमावलिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. संगणक तंत्रज्ञान व नागरी सेवा क्षेत्रातील शिक्षणाच्या दर्जात्मक सुधारणेसाठी त्यांनी प्रयत्न केल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजलीत म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details