पुणे - माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आता या प्रकरणी पुन्हा एकदा सोमवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात बचाव पक्षातून अर्ज केला जाणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना 15 डिसेंबरला पुण्यात अटक करण्यात आली. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली हर्षवर्धन जाधव आणि अजून एका महिला विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अमन चड्डांनी दिली होती फिर्याद
हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा या दोघांविरोधात अमन चड्डा यांनी फिर्याद दिली होती. आता न्यायालयाने या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
'सोमवारी पुन्हा जामिनासाठी अर्ज दाखल करणार'
हर्षवर्धन जाधवांचा जमीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आज आम्ही जामिनासाठी अर्ज केला होता. हा मोठा गुन्हा आहे, असे न्यायाधीशांचे म्हणणे आहे. त्यामुळे जामीन देण्यात आला नाही. आम्ही सोमवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहोत, अशी माहिती यावेळी बचाव पक्षाचे वकील झहीर खान यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळच्या सुमारास आई-वडिलांना दुचाकीवरून ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. याच वेळी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा हे रस्त्याच्या बाजूला एका चारचाकीमध्ये बसले होते. कारचा दरवाजा उघडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यानंतर चड्डा यांनी चारचाकीमध्ये बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला. त्यावर हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांनी अमन चड्डा आणि त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन झाल्याचे सांगितले. मात्र तरीही दोघांनी मारहाण करणे चालू ठेवले. यानंतर चड्डा यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार हर्षवर्धन जाधव यांना बुधवारी अटक करण्यात आली होती.