पुणे -राज्यात सध्या अमरावती, बुलढाणा या विदर्भातील काही भागांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत असून रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती, बुलढाणा या भागात सापडत असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा ब्राझील ब्रिटन किंवा दक्षिण आफ्रिकेतून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन आहे की काय? अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, यात काहीही तथ्य नसल्याचे महाराष्ट्र सरकारने अधिकृत पत्रक जारी करत स्पष्ट केले आहे. सरकारने अधिकृत माहिती जाहीर करण्यामागील कारणे इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी संगितले आहेत.
पुण्यातील ससून रुग्णालयात अमरावती, बुलढाणा तसेच सातारा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले होते. या नमुन्यांच्या तपासणीत कोरोना विषाणूचे म्युटेशन होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, हे म्युटेशन परदेशातून आलेल्या कोरोना विषाणू संदर्भातील नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.