पुणे -पुण्याच्या मांजरी भागातील सीरम इंस्टिट्यूटमध्ये लागलेली आग आटोक्यात आली आहे. सध्या अग्निशामन दलाकडून कुलींगचे काम सुरू आहे. या आगीत शेवटच्या मजल्यावर अडकलेल्या 5 जणांच्या मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. आज दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली होती. त्यानंतर अग्निशामन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझल्यानंतर आग लागलेल्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर पुन्हा एकदा आग लागली होती. पण ती तात्काळ आटोक्यात आणण्यात आली आहे. दरम्यान, पुणे गुन्हे शाखा याबाबतचा समांतर तपास करणार आहे.
- मृतांच्या नातेवाईकांना सीरमकडून प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाखांची मदत सीरम इन्स्टिट्यूटकडून जाहीर करण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटसाठी आजचा दिवस अतिशय दु:खद आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कंपनीच्या निर्धारित नियमांच्या पलिकडे जाऊन दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाखांची मदत जाहीर करत आहोत, असं सीरमचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावला यांनी म्हटले आहे.
- आग लागलेल्या इमारतीत कोव्हिशिल्डचे उत्पादन नाही
जिथे कोरोनाची लस बनवण्याचे काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचे काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.
- मुख्यमंत्री ठाकरे उद्या देणार सीरम इन्स्टिट्यूटला भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्याशी बोलणे झाले आहे. मुख्यमंत्री उद्या (22 जानेवारी) दुपारी पुणे येथे सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.
- वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली असल्याची शक्यता
सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सीरमच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागली होती. तसेच मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे.इमारतीचे काम सुरू होते. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली असल्याची शक्यता राजेश टोपे यांनी वर्तवली आहे.
- आगीत मृत्यू झालेल्यांची नावे
सीरम इन्स्टिट्यूटमधल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून, यात चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हे सर्व मृतदेह नोबेल हॉस्पिटलमध्ये नेले आहेत. यातील दोघेजण हे मूळचे उत्तरप्रदेशचे असून, एकजण बिहार आणि दोघेजण हे पुण्यातील होते.
1) रामा शंकर हारिजण ( रा. उत्तरप्रदेश)
2) बिपीन सरोजी (रा. उत्तरप्रदेश)
3) सुशीलकुमार पांड्ये ( रा. बिहार)