पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटेच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचा धावता दौरा केला. मेट्रो संदर्भातील मुख्य अधिकारी ब्रिजेस दीक्षित यांच्या सोबत बैठक घेतली. दरम्यान, संत तुकाराम नगर येथील मेट्रो स्थानकातून सविस्तर पाहणी करत मेट्रोचे पहिले तिकीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. त्यानंतर अजित पवार, मेट्रो मुख्याधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्या समवेत काही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संत तुकाराम नगर ते पिंपरी (खराळवाडी) असा प्रवास केला.
दरम्यान, अजित पवार यांचा मेट्रो पाहाणीचा पहिलाच दौरा असल्याने मेट्रो चे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अजित पवार हे ठीक सहा वाजता फुगेवाडी येथील कार्यलयात पोहचले. तिथे उपस्थित मेट्रो अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केले, मेट्रो कार्यालयात मेट्रो संदर्भात बैठक पार पडली. त्यानंतर, मुख्य मेट्रो रेल्वे स्थानकाकडे अजित पवार गेले, तिथे मेट्रोचा पाहणी दौरा करत मेट्रोच्या प्रवासाचा आनंद देखील घेतला.