पुणे -ससून रुग्णालयातील कोविड इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून मोक्काच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दीप्ती काळे या महिलेने आत्महत्या केली. आज (दि. 27 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.
ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून मोक्काच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची आत्महत्या - पुणे कोरोना बातमी
मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या एका महिला गुन्हेगाराने ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. ही घटना आज (दि. 27 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास घडली.
![ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून मोक्काच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची आत्महत्या मृत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11558647-thumbnail-3x2-pune.jpg)
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सराफ व्यवसायिक बळवंत मराठे यांच्या आत्महत्या प्रकरणात दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांना अटक करण्यात आली होती. मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, अटक करण्यात आल्यानंतर दीप्ती काळेची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तिला ससून रुग्णालयातील कोविड वॉर्ड या इमारतीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज (दि. 27 एप्रिल) सकाळी पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी दीप्ती काळे आणि तिच्या जोडीने संगनमताने गुन्हेगारी कृत्य केल्यामुळे मोक्कांतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास दीप्तीने कोविड वॉर्डातील आठव्या मजल्यावरील स्वच्छतागृहातून खाली उडी मारल्याचे सांगण्यात येते. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दीप्ती काळे व निलेश शेलार यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 26 एप्रिल) आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याची 48 गुंठे जागा नावावर करून घेतली होती. तर आणखी 52 गुंठे जमीन नावावर करून देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जात होता, अशी तक्रार एका महिलेने दिली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा -पाटस येथे माय लेकराचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत, घातपात झाला असल्याचा नातेवाईकांना संशय