पुणे - प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ( Pradhan Mantri Kisan Samman Yojana ) फेब्रुवारी, २०१९ मध्ये सुरू झाली आहे. या योजनेमध्ये पात्र शेतकरी कुटुंबाला प्रत्येक चार महिन्याला रुपये दोन हजार प्रमाणे वार्षिक रुपये सहा हजार रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आधार कार्ड लिंक बँक खाते असेल तरच पैसे जमा होणार आहे. या योजनेत महाराष्ट्र राज्यात १ कोटी ९ लाख ३३ हजार २९८ शेतकरी खातेदार लाभार्थी असून त्यापैकी १ कोटी ६ लाख ५३ हजार ३२९ खातेदारांची आधारकार्डनुसार माहिती प्रमाणित करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी गणना उपायुक्त विनय कुमार आवटे यांनी दिली आहे. या योजनेत मात्र अद्यापही सुमारे २.७९ लाख लाभार्थी वंचित आहेत. वंचित लाभार्थ्यांपैंकी काहींनी आधार कार्ड दिलेले नाहीत, ज्यांनी आधार कार्ड दिलेले आहे त्यांच्या आधार क्रमांकमध्ये त्रुटी असल्याने ते प्रमाणित होऊ शकले नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
१७ लाख ७८ हजार २८३ लाभार्थ्यांचे आधार बँक खात्याशी लिंक नाही -या योजनेअंतर्गत मार्च, २०२२ अखेर रुपये दोन हजार रुपये प्रमाणे आतापर्यंत १० हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र, एप्रिल, २०२२ ते जुलै, २०२२ या कालावधीतील लाभाची रक्कम आणि या पुढील लाभाची प्रत्येक रक्कम ही लाभांर्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असल्याने त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील १ कोटी ६ लाख ५३ हजार ३२९ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणत झाले आहे. त्यापैकी ८८ लाख ७४ हजार ८७२ लाभार्थ्यांचे आधार त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहेत. मात्र, उर्वरित १७ लाख ७८ हजार २८३ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण जरी झाले असले तरी त्यांनी त्यांचे आधार त्यांनी बँक खात्याला लिंक केलेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी तात्काळ आपल्या संबंधित बँकेत जाऊन आपले बँक खाते हे आधार संलग्न लाभ मिळण्यासाठी अधिकृत करून घ्यावे. जेणे करून त्यांना मिळणार्या लाभाची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असे आवाहनही आवटे यांनी केले आहे.